भातसानगर : शहापूर तालुक्यातील एक गाव, नऊ पाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरू झाली असून या ग्रामस्थांना आतापर्यंत तीन टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
या वर्षी उशिरा का होईना तालुक्यात
पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. ही पाणीटंचाई या वर्षी मागील वर्षीप्रमाणेच उग्र रूप धारण करेल, अशी चिन्हे दिसत आहेत. यावर्षी अवकाळी पावसामुळे आतापर्यंत विहिरींना पाणी असल्याने मागील वर्षीसारखी पाणीटंचाई कमी प्रमाणात जाणवत असताना मात्र येत्या काही दिवसांत कडक उन्हामुळे विहिरींनी तळ गाठल्याने ती भयानक स्वरूप प्राप्त करेल, अशी चिन्हे पाहायला मिळत आहे.
तालुक्यात सद्य:स्थितीत दांड या गावाबरोबरच वरचा गायदरा, नारळवाडी, नवीनवाडी, कोळीपाडा, वारलीपाडा, बिबलवाडी, चिंतामणवाडी, पारधवाडी, उठावा येथे तीन टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. किशोर गायकवाड हे त्यासाठी मेहनत घेत आहेत.
तालुक्यात लाखो रुपये खर्चूनही अनेक गावांमध्ये पाणीयोजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत व आजही त्यांच्यावर तितकाच खर्च होत आहे. तर, अनेक योजना या कागदावरच असून कोणीही या गावपाड्यांचा पाण्याचा प्रश्न कायम सोडवू शकले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे उद्या कोणतीही योजना आली, तरी तालुक्यातील नागरिकांच्या नशिबी तीव्र पाण्याच्या झळा कायमच राहणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.