नितिन पंडीत
भिवंडी - मे महिन्याच्या शेवटी तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असून सध्या तालुक्यातील खारबाव व परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे या भागात नवीन पाईप लाईन टाकून नागरिकांची पाणी समस्या मार्गी लावावी अशी मागणी खारबाव गावातील नागरिकांसह परिसरातील गावांनी स्टेम प्राधिकरणाकडे मागील कित्येक वर्षांपासून केली आहे. मात्र याकडे स्टेम प्राधिकरणाचे पुरता दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खारबावसह परिसरातील नागरिक करीत आहेत.
खारबाव व परिसरातील गावांना स्टेमकडून मागील काही दिवसांपासून अनियमित पाणी पुरवठा सुरू आहे. विशेषम्हणजे रात्री उशिरा एक ते तीन तर कधी कधी पहाटे चार वाजता नळाला पाणी येत असल्याने पाण्याची वाट भगत महिला वर्गाची मोठी झोपमोड होत आहे. विशेष म्हणजे खारबाव विभागात मागील काही वर्षांपासून लोकसंख्या वाढत असून पाणी समस्या बिकट झाली आहे. त्यामुळे या भागात पाण्याची नवी पाईप लाईन टाकून नळ पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक अनेक वर्षांपासून करीत आहेत मात्र त्याकडे स्टेम प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे पुरता दुर्लक्ष होत असल्याने सध्या नागरिकांना पिण्याचे पाणी दोन ते तीन दिवसाआड येत असून पाण्यासाठी महिला वर्गाची मोठी पायपीट होत आहे. त्यातच रात्री अपरात्री अवेळी नळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये स्टेम प्राधिकरणाविरोधात मोठा संताप पसरला आहे.
खारबाव व परीसारतील नागरिकांची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी या भागाला मुबलक पाणी पुरवठा करावा तसेच सकाळच्या सुमारास योग्य वेळेचे नियोजन करून वडघर तसेच खारबाव व परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करावा त्याचबरोबर वडघर ते खारबाव नवीन पाइप लाइन टाकणे संदर्भात दिनांक १६ मार्च २०२० रोजी स्टेमकडून ठराव झालेला असून या वर्षीच्या आर्थिक बजेटमध्ये सदर कामे मंजूर करून निविदा काढून सदर कामास त्वरित सुरुवात करावी अशी मागणी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस अशोक पालकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली असून आमच्या परिसरात पाणी पुरवठा मुबलक व सुरळीत न झाल्यास हक्काच्या पाण्यासाठी ऐन कोरोना संकटात देखील आम्ही जन आंदोलन करू असा इशारा देखील पालकर यांनी दिला आहे.