कल्याण : अतिवृष्टीमुळे उल्हास नदीच्या पाण्यात वाढ होऊन नदीचे पाणी मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात शिरले आहे. त्यामुळे पहाटे ३ वाजल्यापासून या जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.
अ आणि ब प्रभागातील बिर्ला कॉलेजच्या बाजूचा परिरसर, वालधुनी भागाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. मोहिली उदंचन केंद्रातून पाणीपुरवठा बंद असल्याने डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम भागाचा पाणीपुरवठा बंद आहे. मोहिली जलशुद्धीकरण आणि उदंचन केंद्रामधील नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यावर आवश्यक ती दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.
मोहने पम्पिंग स्टेशनमध्येही पाणी शिरल्याने कल्याण ग्रामीण, डोंबिवली पूर्व पश्चिम आणि कल्याण पश्चिम ब प्रभागातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पावसाचे पाणी ओसरल्यावर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील खडकपाडा आणि क प्रभागात पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे.
मुसळधार पावसामुळे बारवी धरणाचे दरवाजे उघडले असल्याची व त्यामुळे शहरात पूरपरिस्थिती गंभीर होणार असल्याची अफवा सर्वत्र आहे. प्रत्यक्षात बारवी धरणाची भरून वाहण्याची पातळी ७२.६० मीटर इतकी आहे. सध्या बारवी धरणाची पातळी ६७.५० मीटर इतकी आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे लगेच उघडण्याची शक्यता नाही. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
-----------