- सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्यातील ४२१ गावपाड्यांत एप्रिल महिन्यातच तीव्र पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. शहापूरच्या कसारा परिसरात गुरुवारी पाण्यासाठी एकाला जीव गमवावा लागला आहे. या जीवघेण्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने दोन कोटी ४६ लाख ५१ हजार रुपये खर्चाचे नियोजन केले असले, तरी जिल्हा परिषदेच्या निष्काळजी व वेळकाढूपणामुळे या उपाययोजना अद्यापही कागदावरच आहेत. प्रशासनाच्या या मनमानीविरोधात जिल्ह्यातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.निवडणुकीअभावी जिल्हा परिषदेवर सुमारे पाच वर्षांपासून प्रशासक राज आहे. अधिकाऱ्यांच्या मर्जीतून कामकाज सुरू आहे. कोणत्याही विकासकामांसंदर्भात साधी कुजबूजही बाहेर येऊ न देता बिनदिक्कत कामकाज सुरू आहे. काही महिने आधीच दोन कोटी ४६ लाख रुपये खर्चाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली असती, तर पाण्यासाठी धडपडणाऱ्या कसाऱ्याजवळील ग्रामस्थांच्या जीवावर बेतले नसते, असे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. तानसा, अप्पर वैतरणा, मोडकसागर, बारवी, मोरबे, पिसे यासारख्या मोठ्या जलाशयांजवळ राहूनही ग्रामीण जनतेला त्यातील पाणी पिण्याचा हक्क नाही. त्यात अधिकारी, प्रशासकांचा मनमर्जीचा कारभार ग्रामीण जनतेच्या जीवावर उठल्याचा आरोप होत आहे. या तहानलेल्या गावखेड्यांच्या पाणीटंचावरील उपाययोजनेवर दरवर्षी कोटीकोटींचा खर्च होऊनही पाण्यासाठी जीव गमवावे लागत आहेत. यंदाही टँकर, विंधन विहिरी, जुन्या नळयोजनांची दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळयोजना आदी कामे करून सुमारे ४२१ गावपाड्यांमधील पाणीटंचाईवर मात करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठीचा २ कोटी ४६ लाख ५१ हजार रुपये खर्चाचा आराखडा तयार कागदावर असल्यामुळे गावखेड्यांत उन्हामुळे होरपळत असून पाण्यावाचून तळमळत आहेत. नियोजन तयार - जिल्हाभरातील ९५ गावांसह ३२६ आदिवासीपाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाईच्या दृष्टीने खर्चाचे नियोजन आहे. मागील वर्षी १५३ गावांच्या टंचाईवर मात करण्यासाठी २३ टँकरने २४ तास पाणीपुरवठा केला. २० जूनला जिल्ह्यात पाऊस पडल्यामुळे काहीअंशी टंचाईला पूर्णविराम मिळाला होता. - यंदा ५९ गावे आणि १५८ पाड्यांना ३८ टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन कागदावर आहे. त्यासाठी ९७ लाख ४१ हजारांचा खर्च निश्चित केला आहे. - शहापूरच्या तीन गावांमधील नळपाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी २८ लाख ५० हजार रुपये खर्चाचे नियोजन आहे. ३३ गावे आणि १६८ पाड्यांमध्ये नवीन विंधन विहिरींच्या कामासाठी एक कोटी २० लाख ६० हजारांचा खर्च निश्चित केला आहे. तालुक्यातील १७१ गावांच्या टंचाईसाठी एक कोटी २३ लाख ७० हजार खर्चाचे नियोजन आधीच केले आहे. - मुरबाड तालुक्यातील ७० गावांमध्ये ५८ लाख ३९ हजाररुपये खर्चाची कामे हाती घेतली आहेत. ही कामे करचोंडे, डोंगरन्हावे, तुळई, पाटगाव, पोटगाव, मुहगड, सिद्धगडला होणार आहेत. - भिवंडी तालुक्यात सात गावे, ५९ पाड्यांमध्ये ४१ लाखांच्या कामांचे नियोजन आहे. - कल्याणमधील नऊ गावे आणि १५ पाड्यांमध्ये १३ लाखांची पाणीसमस्येसंबंधी कामे आहेत. - अंबरनाथ तालुक्याच्या १७ गावपाड्यांमध्ये १० लाखांची कामे आदी पाणीटंचाईवरील उपाययोजना केवळ कागदावर ठेवून जिल्हा प्रशासन ग्रामीण जनतेच्या जीवाशी खेळत असल्याच्या भावना विविध संघटनांच्या नेत्यांकडून ऐकायला मिळत आहेत.
जिल्ह्यात ४२१ गावांत पाणीटंचाई
By admin | Published: April 16, 2017 4:30 AM