सुरेश लोखंडे,ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच कार्यालय वागळे इस्टेट, जीएसटी कार्यालयासमाेर स्थलांतरीत झाले आहे. भाड्याच्या इमारतीत थाटलेल्या या कार्यालयापाेटी जिल्हा परिषद महिन्या काठी ३६ लाख रूपयांपर्यंतचे भाडे खर्च करीत असल्याची चर्चा आहे. ऐवढा माेठा आर्थिक भूर्दंड सहन करणाऱ्या या कार्यालयाच्या इमारतीत माेठी पाणी समस्या उद्भवली आहे. त्यामुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून ते आज सकाळी सर्व इमारतीखाली एकत्र येऊन प्रशासनाच्या निष्काळजी व दुर्लक्षितपणा विरोधात नाराजी व्यक्त केली.
या जिल्हा परिषदेचे कर्मचारी, ग्रामीण व जवळच्या शहरांमधून कार्यालयात येत असतात. लाेकलचा धकाधिकचा प्रवास करून वागळे इस्टेटमधील कार्यालय गाठण्यासाठीही त्यांना १०० रूपयांपर्यंतचा खर्च करावा लागत आहे. हा आर्थिक भूर्दंड सहन करूनही एक ते दीड तास रिक्षासाठी वाट पहावी लागत आहे. या समस्ये पाठाेपाठ आता कार्यालयात व बाथरूममध्येही पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. त्याविराेधात वाचा फाेडण्यासाठी आज हे सर्व कर्मचारी इमारतीच्या आवारात एकत्र येऊन प्रशासनाच्या मनमानी व निष्काळजीविराेधात तीव्र संताप व्यक्त करीत हाेते.
या कार्यालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या आखत्यारीतील ग्रामीण, दुर्गम भागातील गांवखेडे या कडक उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला तोंड देत आहे. सध्या २० ते २५ टॅंकरने होणारा पाणी पुरवठाही कमी पडत आहे. या गांवखेड्याच्या विकासासाठी सतत सक्रीय असणाऱ्या या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कर्मचारी तीव्र आंदाेलन छेडून प्रशासनाचे वाभाडे काढण्याच्या प्रयत्नात आहे.