उल्हासनगर : शहराच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याची दखल आमदार कुमार आयलानी यांनी घेऊन, महापालिका पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी आयलानी यांनी घेऊन निर्देश दिले. एमआयडीसीकडून कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने, शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
उल्हासनगरातील खेमानी परिसर, सुभाष टेकडी, गायकवाड पाडा, महादेवनगर, संतोषनगर, कैलास कॉलनी, गणेशनगर, ओटी सेक्शन भीमनगर, मराठा सेक्शन आदी परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली. परिसरातील नागरिक पाणी टंचाईचा जाब विचारण्यासाठी महापालिका पाणी पुरवठा विभाग व आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयात जात आहेत. अखेर आमदार कुमार आयलानी यांनी सोमवारी आमदार कार्यालयात महापालिका अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली.
बैठकीला अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ सुभाष जाधव, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांच्यासह भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष जमनूदास पुरस्वानी उपस्थित होते. महापालिकेला एमआयडीसी कडून कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने, पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती यावेळी अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी दिली.
शहराला अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने, उंच जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने, शेवटच्या घरा पर्यंत पाणी पोहचत नाही. अशी कबुली यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच जलवाहिणीला गळती लागल्याने, जलवाहिणीला पाणी गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी खाली जात आहे. जलवाहिनी गळती दूर करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. असे संकेतही अधिकाऱ्यांनी दिले. आमदार कुमार आयलानी व भाजप शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी मात्र अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणी पुरवठा वितरण अनियमित होत असल्याचे सांगितले. काही भागात दिवसाला दोन वेळा तर काही भागाला दिवसातून अर्धा तासही पाणी येत नसल्याचे सांगितले. पाणी पुरवठा वितरण व्यवस्था सुधारण्याचे आदेश आयलानी यांनी यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.
जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू
ज्या विभागात व परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली. अश्या विभागात नव्याने जलवाहिन्या टाकण्याचे काम महापालिका पाणी पुरवठा विभागाने सुरू केले. तसेच जलवाहिन्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून इएमआयडीसीला नियमित व पुरेसा पाणी पुरवठा करण्याचे पत्र दिले. अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.