ठाणे: वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट ही एमआयडीसीची पहिली औद्योगिक वसाहत असून येथे एमआयडीसीच्या बारवी धरणातून पाणी पुरवठा होतो. मात्र, गेली अनेक वर्षे पाण्याचा मोठया प्रमाणात तुटवडा आहे. त्याचप्रमाणे येथील प्लॉट धारकांना गेली 15 ते 20 दिवस तर काही ठिकाणी 25 दिवस वापरायला तर नाहीच पिण्यासाठी देखील पाणी मिळत नाही आणि कधी चुकून आलेच तर अत्यंत कमी दाबाने येते. या समस्याबाबत तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयाकडे केल्याचे ठाणे लघु उद्योग संघटनेचे चेअरमन डॉ. अप्पा खांबेटे यांनी सांगितले.
वागळे इस्टेट हे बारवी धरणापासून शेवटचे टोक आहे तसेच येथील भौगोलिक स्थिती वेगळी असल्याने पाणी पुरवठयाची सम व विषम परिस्थिती झाली आहे. त्यातच एमआयडीसीचे पाणी चार महानगरपालिका बूस्टर पम्पाद्वारे जास्तीत जास्त उचलतात असल्यामूळे वागळे इस्टेट मध्ये पाणी पोहतच नाही. एमआयडीसीने काही वर्षांपूर्वी वागळे इस्टेटला माहिती तंत्रज्ञान पार्क जाहीर केले होते. आज जवळपास 57 पार्क आहेत. अधिक अस्तिवात असलेल्या स्थानिक कंपन्यांकडे अर्धा इंच ते एक इंच जोडणी आहे. त्यामुळे या सर्व प्लॅाट धारकांना टँकर शिवाय पर्याय नाही. तसेच बुधवारी संघटनेने पंतप्रधान कार्यालयास सुध्दा पत्रकाद्वारे माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.
त्यासोबतच उद्योग मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी ,स्थानीक अभियंता यांना पत्राद्वारे, SMS द्वारे तसेच ट्विटरच्या माध्यमातूनही राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री व उद्योगमंत्र्यांना माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.
पाण्याअभावी उद्योग बंद पडतील व बेकारी वाढू शकते. त्यामुळे वागळे औद्योगिक वसाहती मधील प्लॉट धारकांना निदान नियमित पाणी पुरवठा मिळावे अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.