भातसानगर : शहापूर तालुक्यात हिवाळा संपतो न संपतो तोच दोन पाड्यात पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरूवात झाली आहे. तालुक्यात मागीलवर्षी कमी पाऊस झाल्याने व पाऊसही लवकरच गेल्याने गावपाड्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. यावर्षी अधिक पाऊस पडल्यामुळे उशिरा पाणीटंचाई निर्माण होईल असे वाटत असतानाच अजनूप, दापूर परिसरातील कोळीपाडा व वरचा गायदरा या दोन पाड्यात टंचाई निर्माण झाली आहे.
कोळी पाडा व वारली पाडा येथील ग्रामस्थ एकाच विहिरीवर पाणी भरतात. मात्र आता याच विहिरीत पाणी नसल्याने त्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोळीपाड्याची लोकसंख्या आज अडीचशेच्या आसपास असून वारली पाड्याची लोकांख्या ही शंभर इतकी असून या दोन्ही पाड्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
या पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी सोमवारीच ग्रामपंचायतीने गटविकास अधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे. अजूनही हिवाळा संपला नसूनही या पाड्यांत पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना आता पाण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागणार आहे. दरवर्षी या पाड्यात टंचाई निर्माण होत असून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.माझ्या ग्रामपंचायत क्षेत्रातील कोळीपाडा, वरचा गायदरा या दोन पाड्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी संबंधित विभागाकडे केली आहे. - प्रदीप चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य