सुरेश लोखंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यातील शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील पाण्याने आदिवासी गावपाड्यांना वेढा घातला आहे. अशा बिकट प्रसंगात तळ्याचीवाडी येथील गरोदर महिलेला प्रसूतिकळा सुरू झाल्या. त्यामुळे महिलेला झोळीत घालून कसेबसे जंगलाच्या वाटेने मुरबाड गाठावे लागले.बारवी धरणाच्या पाणलोटातील गावांना पाण्याने वेढले आहे. मुरबाड तालुक्यातील मानिवली ग्रामपंचायतीमधील ही तळ्याचीवाडी आदिवासी लोकवस्तीची आहे. धरणग्रस्तांच्या या वाडीत आदिवासी समाज वास्तव्याला आहे. गरिबीला तोंड देणाºया या गावातील चंद्रकला रघुनाथ झुगरे हिला प्रसूतिकळा सुरू झाल्या असता, रुग्णालयाकडे जाणारे तिन्ही बाजूंचे रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी जंगलातून या महिलेला झोळीत टाकून पायवाटेने मुरबाड येथील रुग्णालयापर्यंत पोहोचवले. १७ जुलै रोजी गावकºयांवर हा प्रसंग ओढवला होता.
पहिले बाळंतपण असलेल्या या मातेला रुग्णालय गाठण्यासाठी धड रस्ताही मिळाला नाही. शांघायशी बरोबरी करू पाहणाºया मुंबई, ठाणे परिसरात असलेली ही परिस्थिती सर्वांसाठीच खेदजनक आहे. या जंगलातून वनविभाग रस्ता काढू देत नसल्यामुळे गावपाड्यांच्या रहिवाशांना पाऊलवाटेने, दगड, काट्यांतून महिलेला झोळी करून रुग्णालयात न्यावे लागले. या झोळीत लाकडाचा दांडा टाकून तो दोन्ही बाजूंनी दोघांनी उचलून महिलेचा मार्ग सुकर केला. दुर्दैव म्हणजे, शस्त्रक्रियेचे टाके काढण्यापासून पुढील उपचारासाठी याच झोळीने महिलेला मुरबाड गाठावे लागत आहे. जंगल, कच्चा रस्ता, दगडधोंडे व चिखलातून तिला हा प्रवास रोज करावा लागत आहे. या भागातील आदिवासींसाठी या समस्या पाचवीला पुजलेल्या आहेत. डोक्यावरून रेशन, बाजार तीन किमीपर्यंत आणायचे. आजारी व्यक्ती, रात्री-अपरात्री कधीही कुठेही पायी जायचे, आदी समस्यांनी आदिवासी हैराण झाले आहेत.
शासनाच्या योजना फक्त कागदावरचझोळीत घालून महिलेला रुग्णालयात नेले असता, उशीर झाल्याचे सांगून त्यांना खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे शस्त्रक्रियेद्वारे महिलेची प्रसूती झाली. त्यासाठी आलेला ३0 हजार रुपयांचा खर्च या आदिवासींनी एकत्र मिळून केला. अशावेळी शासनाच्या योजना फक्त कागदावरच अस्तित्वात असल्याचे दिसून येते, असे या परिसरातील समाजसेविका अॅड. इंदवी तुळपुळे यांनी सांगितले.