कल्याण : मुसळधार पावसामुळे तीन दिवस बंद असलेला कल्याण-मुरबाड रोडवरील एक पेट्रोलपंप मंगळवारी सकाळी सुरू झाला. त्यामुळे तेथे पेट्रोल भरण्यासाठी वाहनचालकांनी गर्दी केली. मात्र, पेट्रोल भरल्यानंतर काही अंतरावर जाताच दुचाकी बंद पडत असल्याने चालकांनी गॅरेज गाठले. त्यावेळी पेट्रोलमध्ये पाणी असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी पंपचालकाला जाब विचारला.कल्याण शहरातील अनेक भागांमध्ये पावसामुळे पाणी भरले होते. या पंपावरील पेट्रोलच्या टाकीत पाणी गेले होते. मात्र, ते तसेच चालकांना देण्यात आले. वाहने बंद पडू लागल्याने दुचाकीस्वारांनी पुन्हा पेट्रोल पंप गाठत पंपचालकाला जाब विचारत गोंधळ घातला. याबाबत माहिती महात्मा फुले चौक पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी पंपचालकाने काही नागरिकांचे पैसे परत केले. तर, काहींना पुन्हा पेट्रोल भरून दिले. याबाबत पेट्रोल पंपचालकाने पाणीमिश्रित पेट्रोल असल्याच्या आरोपाचे खंडन केले.
पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित पेट्रोल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 1:59 AM