ठाणे : ठाणे महानगरपालिकेला केवळ १० एमएलडी अतिरिक्त पाणी देण्यासाठी हात आखडता घेणाऱ्या स्टेम प्राधिकरणाने विकासकांच्या प्रकल्पांना मात्र ६५ एमएलडी पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली असल्याची धक्कादायक बाब सोमवारी ठाणे महापालिकेत झालेल्या स्टेमच्या बैठकीत उघड झाली. एकीकडे महापालिकांची तहान भागत नसताना खासगी विकासकांना ६५ एमएलडी पाणी देण्याच्या प्रस्तावांना मंजुरी कशी दिली, असा सवाल करून महापौर तसेच गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष नरेश म्हस्के यांनी हे सर्व वादग्रस्त प्रस्तावच रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला. यात टाटा आमंत्रा आणि अंजूर येथील टाऊनशिपसह इतर विकासकांचाही समावेश आहे. ठाणे महानगरपालिकेला अतिरिक्त पाणी देण्यास नकार देणाऱ्या स्टेमला महानगरपालिकेने चांगलाच हादरा दिला आहे. स्टेमकडून कल्याण बायपास येथील टाटा आमंत्राला तब्बल दोन लाख लीटर, तर अंजूर येथील आणखी एका टाऊनशिपला एक लाख लीटर पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. परंतु, आता हा पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या विकासकांना मोठा झटका बसला आहे.
विकासकांना दिलेले पाणी होणार खंडित, महानगरपालिकेचा स्टेमला चांगलाच हादरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 12:36 AM