अंबरनाथ : दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या वाढत्या तक्रारींनंतर अंबरनाथच्या चिखलोली धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतला आहे. पर्याय म्हणून एमआयडीसीचे पाणी पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शिवाजीनगर, महालक्ष्मीनगर आणि परिसरात ५० हजार लोकवस्ती असलेल्या भागाला चिखलोली धरणामधून सहा दशलक्ष लीटर पाणी वितरित केले जाते. मात्र धरणातून होणारा पाणीपुरवठा दूषित आणि दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारीवरून तूर्त चिखलोलीतून पाणी वितरण करण्याचे थांबविण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. दूषित पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याचे कार्यकारी अभियंता एस. के. दशोरे यांनी सांगितले.
मागील वर्षापासून धरणाची उंची अडीच मीटरने वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यामुळे धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. या वर्षी पावसाळ्यात चिखलोली धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले होते, पावसाळ्यात उंची वाढविण्याचे काम बंद होते, ते काम पुन्हा सुरू होईपर्यंत धरणातील पाणीपुरवठा सुरू ठेवण्याची मागणी सर्वपक्षीयांनी लावून धरली होती. अखेर मागील महिन्यात ऑक्टोबरमध्ये धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे सांगत विविध राजकीय पक्षांनी तक्रारी, आंदोलने केल्याने मंगळवारपासून पाणी वितरण बंद करण्यात आले आहे.