ठाणे : पिसे-टेमघर जलशुद्धीकरण केंद्राला जाणाऱ्या अशुद्ध मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती, तसेच १५०० मिमी मल्टी फंक्शन व्हॉल्व्ह बसविण्यासाठी बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तासांचा शटडाउन घेण्यात येणार आहे. या कालावधीत झोनिंग करून शहरात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या पिसे टेमघर जलशुद्धीकरण केंद्राला जाणाऱ्या अशुद्ध मुख्य जलवाहिनीला कल्याण- पडघा रोडच्या बाजूला सावधनाका येथे गळती आढळून आलेली आहे. या गळतीमुळे मोठ्याप्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असून, कल्याण-पडघा रोडवर या ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे सदर ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी ही गळती थांबविण्याचे काम तातडीने करण्याची आवश्यकता आहे. तसेच, अशुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील वसाहतीमध्ये १५०० मिमी मल्टी फंक्शन व्हॉल्व्ह बसविण्यासाठी २३ मार्च, २०२२ रोजी सकाळी ९.०० ते गुरुवार सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तासांचा शटडाउन घेण्यात येणार आहे.
येथे पाणीपुरवठा राहणार बंद
यानुसार २३ मार्च, २०२२ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ९. ०० वाजेपर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, समतानगर, आकृती, सिद्धेश्वर, जॉन्सन, इंटरनिटी, ब्रम्हांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, कोलशेत, तसेच आझादनगर या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, बुधवार रात्री ९. ०० ते गुरुवार सकाळी ९ .०० वाजेपर्यंत ऋतुपार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, कळवा व मुंब्र्याच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
दोन दिवस कमीदाबाने पाणी
या शटडाउनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमीदाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.