लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा फटका ठाणे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाला बसला आहे. परंतु, असे असतानाही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मागील वर्षीच्या तुलनेत जास्तीची वसुली केली आहे. त्यानुसार, आतापर्यंत ६४ कोटी दोन लाख ७२ हजार २१ रुपयांची वसुली केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ती अधिक आहे. परंतु, आता गेली कित्येक वर्षे पाण्याची बिले थकविणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांच्या विरोधात पाणीपुरवठा विभागाने मोहीम उघडली आहे. त्यानुसार, त्यांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
यावर्षीचे आर्थिक वर्ष संपायला काही दिवस राहिलेले असताना देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. तेव्हापासून बहुतांश आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. दोन महिन्यांनंतर जूनपासून पालिकेच्या मालमत्ताकराची वसुली सुरू झाली. तर, जुलैअखेरपासून पाणीबिलाची वसुली सुरू असून गेल्या वर्षी १ एप्रिल ते २२ नोव्हेंबरदरम्यान ५३ कोटी ३१ लाख तीन हजार ७९७ रुपयांची वसुली केली होती. मात्र, यंदा कोरोनाकाळात याचदरम्यान ६४ कोटी दोन लाख ७२ हजार २१ रुपयांची वसुली केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ती १२ कोटी अधिक आहे. परंतु, आता ती वाढविण्याबरोबर महापालिकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने कंबर कसली आहे. त्यानुसार, आता कित्येक वर्षे थकबाकी ठेवणाऱ्या थकबाकीदारांची यादी तयार करून मोठ्या थकबाकीदारांचे पाणीकनेक्शन कट करण्याची मोहीम मागील १५ दिवसांपासून सुरू केल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपनगरअभियंता विनोद पवार यांनी दिली. यामध्ये वाणिज्य पाणीकनेक्शनबरोबरच इमारतधारकांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला मोठे थकबाकीदार, त्यानंतर कमी रकमेचे थकबाकीदार अशी वर्गवारी करून टप्प्याटप्प्याने ती सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कर्मचाऱ्यांचा ताफामहानगरपालिकेची आर्थिक घडी विस्कळीत झाल्याने थकबाकी वसुली प्राधान्याने आणि काहीशी कठोरतेनेच केली जाणार आहे. त्यामुळे ही मोहीम पालिकेसाठी महत्वाची असून, यासाठी पालिकेचे ४० मीटररीडर यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची टीम सज्ज आहे.