डोंबिवली : शहराच्या पूर्व भागातील औद्योगिक निवासी परिसरातील एमआयडीसीने उभारलेली पाण्याची टाकी सद्यस्थितीत वापराविना पडून आहे. या पाण्याचा टाकीचा वापर पुन्हा सुरु केल्यास पाणी समस्या सुटण्यास मदत होऊ शकते असा मुद्दा डोंबिवली वेलफेअर अशोशिएशनच्या वतीने करण्यात आला आहे.
एमआयडीसी निवारी परिसरात 20 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी एमआयडीसीने उभारली होती. ही टाकी वापरात नसल्याने ती जुनी झाली आहे. या टाकीचा वापर नसल्याने ती पाडून त्याठिकाणी नवी उभारावी. तिचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. ती वापरा योग्य असल्यास तिचा पुनर्वापर करण्यात यावा. या विषयी माहितीच्या अधिकारात जागरुक नागरीक राजू नलावडे यांनी एमआयडीसीकडे माहिती मागितली होती. एमआयडीसीकडून निवासी व ग्रामीण भागास 210 दश लक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. हा पाणी पुरवठा जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून केला जातो. त्यासाठी निवासी परिसरात 20 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. ही टाकी 1980 साली बांधण्यात आली. तिचा वापर सुरु होता. साधरणत: दोन ते तीन वर्षात तिचा वापर बंद झाला. 1982 सालापासून तिचा वापर बंद झाला आहे. ही टाकी वापराविना बंद आहे. या टाकीच्या उभारणीवर एमआयडीसीने किती खर्च केला होता. त्याची माहिती एमआयडीसीकडे उपलब्ध नाही. सध्या ज्या ठिकाणी ही पाण्याची टाकी आहे. त्याठिकाणी पाणी पुरवठा करणारे मीटर टेस्टींगची प्रयोगशाळा चालविली जाते. त्यामुळे टाकीत पाण्याचा वापर फारच कमी आहे. टाकीतील थोडेफार पाणी टेस्टींगपश्चात आसपासच्या झाडांना टाकले जाते. या टाकीची संरचना तपासून तिचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन ती वापरा योग्य आहे की नाही याची पाहणी केली जाईल असे एमआयडीसीकडून कळविण्यात आलेले आहे.
27 गावे व औद्योगिक निवासी परिसर हा कल्याण डोंबिवली महापालिकेत होता. त्यानंतर 2002 साली 27 गावांसह औद्योगिक निवासी परिसर वगळण्यात आला. पुन्हा जून 2015 पासून 27 गावे व औद्योगिक निवासी परिसर महापालिकेत समाविष्ट करण्यात आला. 27 गावांना एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जातो. आजमितीस 27 गावांना दररोज एमआयडीसीकडून 30 दस लक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. 27 गावात पाणी वितरण व्यवस्थेचे जाळे नाही तसेच 27 गावात पाणी साठवणूक करण्यासाठी पाण्याच्या टाक्या नाहीत. एमआयडीसी निवासी परिसरातील वापराविना पडून असलेली 20 लाख लिटर क्षमतेच्या टाकीचा वापर केल्यास काही अंशी 27 गावातील काही गावांसह निवासी भागाला दिलासा मिळू शकतो. साठविलेले 20 लाख लिटर पाणी सम प्रमाणात काही ठिकाणी वितरीत करता येऊ शकते. याकडे अशोशिएशनच्या पदाधिका:यांनी लक्ष वेधले आहे.