पालघर/ नंडोरे : पालघर व २६ गावांसाठी असलेल्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत टाकलेल्या जलवाहिन्यास्थित एअरवॉल्व्हमधून दररोज हजारो लिटर पाणी गळती होऊन पाणी वाया जात असल्याचे लोकमतने अलीकडेच निदर्शनास आणून दिले तरी जीवनप्राधिकरण तसेच या योजनेचा लाभ घेणारे पालघर नगरपरिषद व पंचायत समितीचा पाणीपुरवठा विभाग तिच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच या पाणीपुरवठा अंतर्गत वाघोबा मंदिरापासून रस्त्याच्या समांतर जाणारी जलवाहिनी अनेक ठिकाणी जीर्ण होऊन फुटलेली असून या तिला ही गळती लागून दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते आहे. याकडे प्रशासनाला लक्ष देण्यास फुरसत नसल्याचे दिसून येत आहे.वाघोबा मंदिरापासून पुढे जाताना रस्त्याच्या समांतर असलेल्या जलवाहिनीस एअरवॉल्व्ह जोडलेला आहे. त्या ठिकाणीची जोडणी जीर्ण झाली असून तिला छिद्रे पडल्याने जलवाहिनीतील दबावामुळे हे पाणी या छिद्रातून बाहेर पडून मोठ्या प्रमाणत गळती होत आहे. पुढे याच रस्त्याच्या कडेला अशाच प्रकारचा आणखी एक एअरव्हॉल्व्ह जीर्ण होऊन त्यातून पाणी वाया जाऊन गळती होत आहे. ही प्रचंड पाणीगळती पाहून येथून ये-जा करणारे लोकही अस्वस्थ होतात. पुढे मासवणपर्यंतही असेच एअरवॉल्व्ह बसविलेले असून काही जीर्ण झाल्यामुळे त्यातून पाणी गळती होताना दिसत आहे.शेलवली जलशुद्धिकरण केंद्रातून शुद्ध पाणी पुरवणारी जलवाहिनी याच केंद्राच्या समांतर काही अंतरावर एका ठिकाणी पूर्णत: गंजून गेली आहे. या गंजलेल्या ठिकाणी ही जलवाहिनी फाटली आहे. पाण्याच्या जोरदार दबावामुळे त्या ठिकाणी पाणी गळती होत आहे. ही जलवाहिनी व एअरवॉल्व्हची वारंवार चाचणी करून ते दुरूस्त करणे अपेक्षित असताना या गंभीर बाबींकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ही जलवाहिनी व हे एअरवॉल्व्ह असेच नादुरूस्त राहिले तर प्रसंगी जलवाहिनी फुटू शकते. याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे व ही पाणीगळती थांबविण्यासाठी योग्य ती उपाययोजना झाली पाहिजे. अलीकडेच जिल्ह्यात शासनामार्फत जलसप्ताह साजरा करण्यात आला. जिल्ह्यात साजरा झालेल्या या जलसप्ताहात लघु पाटबंधारे विभागासह जीवन प्राधिकरणा आदी सर्व यंत्रणा सहभागी झाल्या होत्या. या जलसप्ताहात जनतेला पाणी बचतीचे धडे देण्यात आले. जनतेला धडे देणाऱ्या या यंत्रणेला पाणी बचतीचे महत्व कोणी शिकवावे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.(वार्ताहर)
जलवाहिनीची गळती अजूनही आहे सुरूच
By admin | Published: April 21, 2016 2:09 AM