अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : कळवा पूर्व भागातील भास्कर नगर, पौंड पाडा आदी भागात असलेल्या पाणी टंचाईचे भीषण वास्तव समोर आल्यानंतर आता येथे पाण्याची चोरी होत असल्यानेच नागरीकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या पाणी माफियांच्या विरोधात तत्काळ कारवाई करण्यात यावी, त्यांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी राष्टÑवादी अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते नजीब मुल्ला आणि शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे. परंतु आता येथील पाण्यासाठी सुचविण्यात आलेल्या उपाय योजनेमुळे पाणी समस्या सुटणार असतांना केवळ याचे श्रेय आपल्याला मिळावे यासाठी आव्हाड गटाकडून हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कळवा पूर्व येथे गणपती दर्शनाला गेल्यावर लोकांनी पिण्याच्या पाण्याविषयी आमच्याकडे तक्रारी केल्या. स्थानिक लोकप्रतिनिधींची लोक प्रत्येक कुटूंबाकडून बोअरवेलच्या पाण्यासाठी ५०० रुपये गोळा करत असतात अशी माहिती दिली. याबाबत पोलिसांकडे शहनिशा केल्यानंतर पोलीसांच्या तपासात येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचे १६ गुंड दरमहिन्याला लोकांकडून ३० ते ४० लाख रुपयांची खंडणी गोळा करत असल्याची माहिती दिली, ही खंडणी वसूल करणार्यांची नावे व यामागील सूत्रधार लवकरच जाहीर करणार असल्याचेही मुल्ला यांनी सांगितले.
कळवा पूर्व येथील भास्कर नगर, पौंडपाडा, आतकोनेष्शर नगर येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या तक्रारीनंतर ठाणे महापालिका आयुक्तांकडे तत्काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन दिले असून स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मदतीने केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत २४० कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेला देण्यात आले आहेत. या अमृत योजनेतुन कळवा पूर्व येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सहा महिन्यात मार्गी लावणार आहोत, ही बाब आमदार जितेंद्र आव्हाड यांना कळल्यानंतर गेली १४ वर्ष शांत बसलेले आव्हाड जागे झाले आणि शुक्रवारी कळवा पूर्व येथील नागरिकांच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा काढून श्रेयाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.