भातसानगर : शहापूर तालुक्यातील तब्बल सव्वादोनशे गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असला, तरी ती तात्पुरती सोय आहे. ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता नागरिक करू लागले आहेत.
तालुक्यातील सव्वाशे गावपाड्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू असला, तरी तो पुरेसा नाही. नागरिकांची पिण्याच्या पाण्याची तेवढी सोय होते. इतर कामाला लागणाऱ्या पाण्यासाठी मात्र त्यांना इतर उपलब्ध पर्यायांचा उपयोग करावा लागतो. दिवसभर टिपटिप पडणाºया झºयाच्या स्वरूपातील पाणी असो वा दूरवरून नदी, ओहळाच्या चिपतारातील असो, त्या पाण्यासाठी मात्र जंगजंग पछाडावे लागत आहे. तालुक्यातील तेलमपाडा, धेंगणमाळ, सुसरवाडी या पाड्यातील नागरिकांना तब्बल दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भातसा नदीच्या अंतर्गत भागातील पात्रात पाणी आणायला जावे लागत आहे.
सकाळी पाण्यासाठी गेलेली महिला दोन तासांनंतर घरी येते, ती थकूनच! इतर महिला या ठिकाणी पाण्यासाठी जाऊन परत येतील, याची मात्र शाश्वती देता येत नाही. अशाच ठिकाणाहून या पाड्यातील महिला पाणी आणत आहेत. ७८१ लोकसंख्या असलेल्या या पाड्यातील नागरिकांना वर्षानुवर्षे उन्हाळ्याच्या दिवसांत घोटभर पाण्यासाठी झुंजावे लागत आहे.
पाड्यांमध्ये दोन दिवसांआड पाणी पुरवले जाते. मात्र, ते पुरेसे नसल्याने आम्हाला रोजच नदीवर पाण्याला जावे लागत असल्याचे महिलांनी सांगितले. त्यामुळे आमच्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे .
शहापूर तालुक्यात धरणे असूनही येथील ग्रामस्थ तहानलेला आहे. दरवर्षी येथील नागरिकांना पाणीटंचाईला सामेरे जावे लागत आहे.आमच्या पाड्यांमध्ये पाणीटंचाई ही वर्षानुवर्षे तशीच कायम आहे. दोनदोन दिवसांनी टँकरने होणारा पाणीपुरवठा अपुरा आहे. - मंजुळा कालचिडा, ग्रामपंचायत सदस्य
या गावांना मोठी पाणीयोजना मंजूर करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. - एम.व्ही. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता