डोंबिवली: शहराला सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपून काढले असून पाणीच पाणी चोहीकडे अशी स्थिती झाली आहे. शहराच्या पूर्व-पश्चिम प्रत्येक कोपऱ्यात पाणी जमा झाले असून सर्वत्र गैरसोय झाल्याचे दिसून आले. पश्चिमेला खाडी किनारा, कोपर पूर्व, आयरे, नांदीवली, पूर्वेला डॉ. राथ रस्ता, स्टेशन परिसर पूर्ण पाण्याखाली गेला होता. त्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते.
सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढलेला होता. रविवारी रात्री चार तास झालेल्या पावसाने शहरातील नालेसफाईची पोलखोल केली. एमआयडीसीत प्रवेश करणारा सेवा रस्ता पूर्ण पाण्याखाली होता. त्यामुळे कल्याण शीळ रस्त्यावरून शहरात येणारी वाहने नंदी पॅलेस भागातील सखल भागात अडकली होती. सुयोग हॉटेलकडून शहरात येता येत नव्हते, तसेच अन्यत्रदेखील हाल झाल्याने वाहनचालक हैराण झाले होते.
नांदीवली भागात समर्थनगर पुन्हा एकदा यंदाही पाण्याखाली गेल्याने तेथील रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. महापालिकने कोणतीही आवश्यक उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. दहा वर्षे तेथील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असून या परिस्थितीला कोणी वाली आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला.
पश्चिमेलादेखील खाडी परिसरात पाणी साचले होते, त्यामुळे काही रहिवाशांची गैरसोय झाली होती. नेहमीप्रमाणे डॉ. राथ रस्त्यावर पाणी साचल्याने रेल्वेस्थानकात जाणाऱ्या प्रवाशांना रामनगर येथील मुंबई तसेच कल्याण दिशेकडील पादचारी पुलाचा वापर करावा लागला.
दोन दिवसांच्या विकेंडमुळे सोमवारच्या भर पावसात भाजी बाजारात गृहिणींनी सकाळच्या वेळेत गर्दी केली होती. त्यामुळे भाजी विक्रेते आनंदी होते, परंतु त्यानंतर दिवसभर पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावल्याने त्या आनंदावर पाणी फिरवले गेले. दिवसभर आकाश ढगाळलेले होते. पावसाचा जोर वाढतच होता.
----------------
शहरातील सर्व हमरस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्यातून मार्ग काढताना त्रास।झाला. रस्त्यावर तुरळक वाहने असली तरीही वाहनांचा वेग मंदावल्याने ठिकठिकाणी कोंडी झाली होती.