ठाणे - जांभळी नाका ते स्टेशन, नौपाडा, गावदेवी या भागातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी आणि स्टेशन परिसर वाहतुक कोंडी मुक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेने या भागात भुमिगत तसेच मैदानात आणि खाजगी भुखंडाच्या ठिकाणी पार्कींगची सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गावदेवी मैदानाच्या खाली त्याच्या बाजूला असलेल्या उद्यानाच्या खाली, शिवाजी मैदान आणि स्टेशन परिसरातील खाजगी मोकळ्या भुखंडावर या पार्कींगच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. स्टेशन परिसरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी या भागात सॅटीस प्रकल्प उभारण्यात आला. परंतु त्यानंतरही येथील कोंडी फुटु शकलेली नाही. उलट त्या कोंडीत आणखीनच भर पडल्याचे दिसून आले. नौपाड्यातील गावदेवी भागात, जांभळीनाका, बाजारपेठ आदी भागातही रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावली जात आहेत. येथे रस्ता रुंदीकरण शक्य नसल्याने आहे त्याच रस्त्याच्या ठिकाणी नव्याने काही प्रयोगही करण्यात आले आहेत. परंतु पार्कींगची सुविधा या भागात उपलब्ध नसल्याने या भागातील कोंडी आजच्या घडीला सुध्दा सुटु शकलेली नाही. सध्या गावदेवी भाजी मंडईच्या ठिकाणी दुचाकी पार्कींगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानंतर आता दुसºया टप्यात गावदेवी मैदानाखाली भुमिगत पार्कींग सेवा उपलब्ध करुन देण्याबाबत पावले उचलण्यात आली असून याची निविदा पुढील आठवड्यात निघेल अशी आशा पालिकेने व्यक्त केली आहे. त्यानुसार या मैदानाच्या खाली १२० दुचाकी आणि १३० चारचाकी वाहनांची पार्कींगची सुविधा उपलब्ध असणार आहे. यासाठी स्मार्टसिटी अंतर्गत २७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- स्टेशन परिसराची वाहतुक कोंडीतून सुटका व्हावी आणि दुरवर कामाला जाणाºया चाकरमान्यांना स्टेशन परिसरात पार्कींगची सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने ही पावले उचलण्यात आली आहेत.
(सुनील चव्हाण - अतिरिक्त आयुक्त, ठामपा)
दुसरीकडे आता या मैदानाच्या बाजूलाच असलेल्या उद्यानाच्या खाली देखील अशा स्वरुपात भुमीगत पार्कींगची सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. याशिवाय स्टेशन परिसरातील खाजगी भुखंड शोधण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून सुरु आहे. जे भुखंड मोकळे असतील त्या ठिकाणी काही महिने का होईना भाडेतत्वावर पार्कींगची सेवा उपलब्ध करुन देण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यानुसार दोन, तीन भुखंड पालिकेने शोधले आहेत. याशिवाय जांभळी नाका भागातील शिवाजी मैदानाच्या ठिकाणी देखील दिवसभर पार्कींगची सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी पालिकेने हालाचाली सुरु केल्या आहेत.