उल्हासनगर : शहरातील बहुतांश जलवाहिन्याना गळती लागून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. पाणीगळती बंद करण्याची मागणी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांना करूनही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उल्हासनगरात काही वर्षांपूर्वी ३०० कोटींच्या निधीतून पाणीपुरवठा वितरण योजना राबवण्यात आली. झोपडपट्टीतील काही भाग सोडल्यास संपूर्ण शहरात नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या. तसेच सात उंच आणि एक भूमिगत जलकुंभ बांधून पाणी वितरण समसमान होण्यासाठी पंपिंग स्टेशन उभारण्यात आले. मात्र, या योजनेचे काम संथगतीने आणि अर्धवट झाल्याने नागरिकांना दररोज मिळणारे पाणी अनेक भागात दिवसाआड पुरवठा करण्याची नामुष्की महापालिकेवर आली. नवीन जलवाहिन्या टाकल्यानंतर जुन्या जलवाहिन्या बंद करायला हव्या होत्या. मात्र, त्या सुरू राहिल्याने पाणी गळतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील खेमानी, रमाबाई आंबेडकरनगर टेकडी, सुभाष टेकडी, शांतीनगर, कुर्ला कॅम्प, गोलमैदान आदींसह शहरातील बहुतांश भागात जलवाहिन्यांना गळती लागल्याचे चित्र आहे. पाणीगळतीमुळे ३० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी वाया जात असून पाण्याची नासाडी थांबविण्याची मागणी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.आयुक्तांनी संबंधित विभागाला पाणी गळती बंद करण्याचे आदेश देऊ न विशेष पथक स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच विशेष निधीची तरतूद केल्याचे सांगितले होते. अद्यापही गळतीचे काम सुरू झाले नाही, असा आरोप नगरसेवकांसह नागरिक करीत आहेत. पाणीपुरवठा वितरण योजनेंतर्गत इतर ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी वाढीव ५० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.पाणीगळतीचे काम युद्धपातळीवरशहरात बहुतांश ठिकाणी नवीन जलवाहिन्यांतून तर काही भागांत जुन्या जलवाहिन्यांतून पाणीपुरवठा होतो. जुन्या जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी गळती लागल्याने पाणीगळतीचा प्रश्न निर्माण झाला असून पाणीगळती बंद करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याचे आश्वासन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी. जी. सोनावणे यांनी दिलेआहेत.