ठाणे : शहरातील विविध भागांत मेट्रो, रस्त्यांची डागडुजी तसेच नवीन रस्त्यांच्या बांधणीची कामे सुरू आहेत. या कामांदरम्यान रस्ते खोदले जात असल्याने जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात १४ महिन्यांत १२८ ठिकाणी जलवाहिन्या फुटल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.
जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत होता. त्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक विकासकामांना ब्रेक लागला होता. त्यामुळे ठाणे शहरातील मेट्रोच्या कामांसह रस्त्यांच्या नूतनीकरणासह डागडुजीची कामे थांबली होती. कालांतराने लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुन्हा विविध संस्थांमार्फत करण्यात येणाऱ्या विकासकामांना सुरुवात झाली. त्यानुसार ठाणे शहरात मनपातर्फे रस्त्यांचे मजबुतीकरण करणे, काँक्रिटीकरणाची कामे तयार करणे आदी कामे मोठ्या प्रमाणात व वेगाने सुरू झाली आहेत. मात्र, या कामांसाठी खोदण्यात येणाऱ्या रस्त्यांमध्ये टाकलेल्या जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे.
जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधित ९६ जलवाहिन्या फुटल्याच्या घटना घडल्या आहे. यामध्ये सर्वाधिक २० जलवाहिन्या नोव्हेंबरमध्ये फुटल्याची नोंद आहे. त्या खालोखाल डिसेंबरमध्ये १४ जलवाहिन्या फुटल्याची माहिती मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन िविभागाने दिली आहे. दरम्यान, जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ या तीन महिन्यांत ३२ ठिकाणी जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये जानेवारीत १०, फेब्रुवारीत १६, तर, मार्चमध्ये ठिकाणी जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडल्या असल्याची नोंद आहे. या वाढत्या जलवाहिन्या फुटण्याच्या घटनांमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.
-------------------