बदलापूर : बारवी धारण प्रकल्पग्रस्तांचा नोकऱ्या आणि पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. २०१८ मध्ये बारवी धरणाची उंची चार मीटरने वाढवण्यात आल्यानंतर तब्बल १२०० कुटुंबांचे पुनर्वसन करून कुटुंबातील सदस्याला एमआयडीसीत नोकरी देण्यात येणार असल्याचा प्रश्न काही वर्षांपासून प्रलंबित होता. आता हा प्रश्न मार्गी लागणार असून, बारवी धरण प्रकल्पग्रस्तांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
२०१८ मध्ये बारवी धरणाची उंची ६८ वरून ७२ मीटर करण्यात आली. धरणाची उंची वाढल्यानंतर धरण क्षेत्रात असलेल्या काही गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच या गावांतील दळणवळणासाठी बोटीचा किंवा तराफ्याचा वापर करावा लागत आहे.
गावांमधील १२०४ कुटुंबांतील २३० तरुणांना पहिल्या टप्प्यात नोकरी देण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०९ तरुणांच्या नोकरीचा प्रश्न प्रलंबित होता. जिल्हाधिकाऱ्यांनी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला असून लवकरच धरणग्रस्तांचे पुनर्वसन करून उर्वरित कुटुंबांतील तरुणांना टप्प्याटप्प्याने नोकऱ्या मिळणार असल्याचे आमदार किसान कथोरे यांनी सांगितले.
बारवी धरणाची उंची वाढवल्याने बुडीत क्षेत्राचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून ओलिताखाली आलेल्या क्षेत्राचे भूसंपादन करून याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी व प्रांताधिकारी यांना देण्यात आले.