ठाणे : खारेगाव येथील खाडीकिनारी ठाणेकरांसाठी चौपाटी करण्याचा राज्य सरकारचा मानस असून हा प्रकल्प राबवताना तेथील पारंपरिक डुबी पद्धतीने रेती उत्खनन करणाऱ्या भूमिपुत्रांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्र वारी दिली.खारेगाव येथे पूर्वापार डुबी पद्धतीने रेती उत्खननाचा व्यवसाय करणाऱ्या भूमिपुत्रांना जागा खाली करण्याच्या नोटिसा बजावल्यामुळे त्यांच्यात चिंतेचे वातावरण होते. त्यामुळे या भूमिपुत्रांच्या शिष्टमंडळाने आज ठाणे जिल्हा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपली कैफियत मांडली. याप्रसंगी ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी व अधिकारी वर्ग उपस्थित होता.ठाणेकरांसाठी देखणी चौपाटी निर्माण करण्यासाठी युतीचे शासन कटीबद्ध असून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली येथे सुनियोजित आणि आकर्षक पर्यटन केंद्र उभारले जाणार आहे. या चौपाटीचा फायदा विटावा, कळवा, खारेगाव, मुंब्रा येथील लाखो रहिवाशांना होणार असून एक चांगले विरंगुळयाचे केंद्र आपले शासन येथे साकारेल. त्यामुळे शहराच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे. मात्र, ही योजना साकारताना येथे अनेक वर्षांपासून डुबी पद्धतीने रेती उत्खननाचा व्यवसाय करणाऱ्या भूमिपुत्रांवर अन्याय केला जाणार नाही. तसेच सरकार त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शासन या ठिकाणी रेती साठवणूकीसाठी भूमिपुत्रांना ठराविक जागा नेमून देईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. त्यामुळे भूमिपुत्रांना दिलासा मिळाला असून चौपाटीचा मार्गही मोकळा झाला आहे. याप्रसंगी दशरथ पाटील, आर. सी. पाटील आणि नगरसेवक उमेश पाटील व बालाजी काकडे आदी उपस्थित होते.
खारेगाव चौपाटीचा मार्ग झाला मोकळा
By admin | Published: May 01, 2015 10:21 PM