- धीरज परबमीरा रोड : भार्इंदर पूर्व-पश्चिम जोडणा-या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. भुयारी मार्गाचे स्वप्न एकीकडे पूर्ण होत असताना येथील गवळी कुटुंबाचे मात्र ग्रामपंचायतीच्या काळापासून असलेले घर उद्ध्वस्त होणार, या भीतीने त्यांची झोप उडाली आहे. गवळी कुटुंबाची तिसरी पिढी येथे राहत आहे. तीन वर्षांपासून पक्षाघातामुळे पती अंथरुणाला खिळलेले, मुलगी दहावीला, तर धुणीभांडी करून कसेबसे घर चालवणा-या कमल गवळी यांचे राहते घर गेले, तर संसार रस्त्यावर येणार या कल्पनेने त्या हादरून गेल्या आहेत.जेसल पार्क ते भार्इंदर एसटी स्थानक असा रेल्वे मार्गाखालून भुयारी मार्ग बनवण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. पण, कधी तांत्रिक तर कधी आर्थिक वा कधी लालफितीच्या कारभारात अडकलेला हा मार्ग पूर्ण झाला. भार्इंदर स्थानकासमोरील नारायण भुवन हॉटेल व जवळ बांधकाम असलेल्या वळणावर रस्ता अरुंद तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारा असल्याने तेथे पालिकेने कारवाई करून रुंदीकरण केले. हॉटेलचा पुढील भाग तोडण्यासाठी पालिकेने हेमंत शाह यांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. स्वत: शाह यांनीही सहकार्य दाखवले आहे.या ठिकाणी वळणावरच ५६ वर्षीय वसंत गवळी कुटुंबीयांचे छोटेसे घर आहे. वसंत यांचे आजोबा रामचंद्र गवळी यांना २२ मार्च १९२२ रोजी तत्कालीन भार्इंदर ग्रामपंचायतीने गटई कामासाठी या ठिकाणी मंजुरी दिली होती. तशी नकाशाची प्रत आहे. ४ सप्टेंबर १९५६ रोजी ग्रामपंचायतीने दिलेल्या दाखल्यातदेखील गवळी यांचे राहते झोपडे व गटई कामाचा उल्लेख आहे. २ मार्च १९७८ रोजी तत्कालीन पोलीस पाटील यांनीही गवळी कुटुंबीयांच्या वास्तव्याबद्दलचा उल्लेख पत्रात केला होता. १९७७ पासूनच्या गवळी यांच्या नावे असलेल्या वीजदेयकांच्या प्रतीसुद्धा आहेत.२ जानेवारी १९९९ रोजी तत्कालीन नगरपालिका असताना भार्इंदर रेल्वे स्थानकासमोरील रुंदीकरणादरम्यान गवळी यांचे गटईकामाचे दुकान व घराचा भाग पाडला. त्यावेळीदेखील त्यांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन दिले. परंतु, आजतागायत त्यांना कुठलाही मोबदला वा पुनर्वसन झालेले नाही.गवळी ३ वर्षांपासून पक्षाघाताच्या दुस-या झटक्याने अंथरुणाला खिळले आहेत. मुलगी हेमलता ही भार्इंदर सेकंडरी शाळेत दहावीत शिकत आहे. पतीच्या औषधांचा, घर व मुलीचा खर्च भागवण्यातच त्यांची पत्नी कमल यांची दमछाक होत आहे. धुणीभांडी करून त्या संसाराचा गाडा हाकत आहेत. पालिकेकडून अद्याप कोणते पत्र, नोटीस आली नसली, तरी चाललेल्या घडामोडींमुळे कमल व मुलगी हेमलताचा जीव टांगणीला लागला आहे.गवळी कुटुंबीयांकडील कागदपत्रे तपासून त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल. त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही.- डॉ. नरेश गीते, आयुक्तगवळी कुटुंबीयांची तिसरी पिढी येथे राहत आहे. त्यांची परिस्थिती बिकट असली, तरी महापालिकेच्या विकासकामांत सहकार्य करण्यास त्यांनी पुढाकार घेतला, हे महत्त्वाचे आहे. त्यांना पर्यायी घर दिले जाईल.- चंद्रकांत वैती, उपमहापौरगवळी कुटुंबाचे पुनर्वसन आधी करायला आपण पालिकेला सांगणार आहोत. त्यांचा संसार रस्त्यावर येऊ देणार नाही.- हेमंत शाह, जमीनमालक
रस्ता रुंदीकरणामुळे संसार येणार रस्त्यावर , गवळी कुटुंब धास्तावले, बेताची परिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 5:53 AM