राजू काळेभाईंदर - मीरा-भार्इंदरमधील विविध ठिकाणच्या भाजपा मंडळांचे बहुतांशी कार्यरत अध्यक्षांना नारळ देत त्यांच्या पदावर पक्षातील आयारामांची वर्णी लावल्याने नाराज झालेले काही तत्कालीन अध्यक्ष आपल्या समर्थकांसह सेनेत जाण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.मीरा-भार्इंदरमधील भाजपात गटातटाच्या राजकारणाला पालिका निवडणुकीपूर्वी सुरुवात झाली होती. त्यात आ. नरेंद्र मेहता यांचा एक गट तर त्यावेळच्या महापौर गीता जैन यांचा एक निर्माण झाला होता. मेहता यांनी जैन यांच्या गटाला निवडणुकीतच सुरुंग लावण्यास सुरुवात केली. आपल्या मर्जीतील बहुतांशी लोकांना त्यांनी उमेदवारी दिली. आपल्याविरोधात बंड करणा-यांना त्यांनी निवडणुकीतुन बाजुला सारण्यासाठी यथोचित खेळी केली. त्यात ते यशस्वी झाले. निवडणुकीतील बहुमतामुळे त्यांनी पालिकेची सत्ता आपल्याभोवती केंद्रीत केली. त्यांनी आपल्या वहिनी डिंपल यांना महापौरपदी विराजमान केले. तर गटनेतापद आपल्याच मर्जीतील हसमुख गेहलोत यांना बहाल केले. तसेच स्थायीसह विविध समित्यांवरही त्यांनी आपल्या समर्थकांची वर्णी लावुन जैन यांच्या गटाला त्यांनी चारीमुंड्या चीत करण्यास सुरुवात केली. त्यातच शहरातील काही मंडळांच्या अध्यक्षपदी कार्यरत असलेले जैन गटाच्या समर्थकांची त्यांनी ५ डिसेंबरच्या गुप्त बैठकीत गच्छंती केली. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्थानिक मंडळांच्या कार्यावर अंकुश ठेवल्याचे कारण देण्यात येत असले तरी या अध्यक्षांमध्ये काही जण जैन गटाचे असल्यानेच त्यांचे मंडळ बरखास्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते.एकूण १२ मंडळांची संख्या १०वर आणून किरण चेऊलकर यांच्या शांतीपार्क तसेच डॉ. राजेंद्र जैन यांच्या भार्इंदर स्टेशन मंडळाचा कारभार मात्र गुंडाळण्यात आला. त्या १० मंडळांवर कार्यरत असलेले भार्इंदर पश्चिम मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुशील अग्रवाल यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी नगरसेवक सुरेश खंडेलवाल यांची नियुक्ती करण्यात आली. पूर्वेचे मंडळ अध्यक्ष राकेश शहा यांच्या जागी अभिषेक भटेवडा, नवघर मंडळाचे अध्यक्ष शिवकुमार भुदेका यांच्या जागी माजी नगरसेवक मधू पुरोहित, काशी मंडळाचे अध्यक्ष सी. पी. चौहान यांच्या जागी अनिल ताटे, सृष्टी मंडळाचे अध्यक्ष गजानन नागे यांच्या जागी सुरेश दुबे, उत्तन मंडळाचे अध्यक्ष कोळी यांच्या जागी हेरल बोर्जिस, नयानगर मंडळाचे अध्यक्ष एस. पी. मौर्या यांच्या जागी मुनाफ पटेल, गोल्डन नेस्ट ते मीरा रोड मंडळाचे अध्यक्ष संजय थेराडे यांच्या जागी गोल्डन नेस्ट मंडळावर दिपक सावंत तर कनाकिया मंडळावर दिपू नानकवानी व मीरारोड मंडळाचे अध्यक्ष मनोज दुबे यांच्या जागी डॉ. पोपट यांची नियुक्ती करण्यात आली.नव्याने मंडळ अध्यक्षपदी वर्णी लागलेले बहुतांशी राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, काँग्रेस, शिवसेना या पक्षातून भाजपात आलेले असतानाही भाजपातील निष्ठावंतांना डावलून मर्जीतील आयारामांना संधी दिल्याने मंडळ अध्यक्षपदावरून पायउतार झालेल्या काही नाराजांनी माजी महापौर गीता जैन यांना संपर्क साधून नाराजी व्यक्त केली होती. तसेच प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्यासह भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांकडे देखील तक्रारी केल्या. मात्र स्थानिक भाजपातील एकाधिकारीशाही विरोधात कोणी कारवाईचा बडगा उचलण्यास तयार नसल्यानेच नाराजांपैकी काहींनी सेनेचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधुन सेनेतील प्रवेशासाठी इच्छुक असल्याचे मत व्यक्त केल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.
मीरा-भाईंदरमधील भाजपा मंडळाचे काही तत्कालीन अध्यक्ष सेनेच्या वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 5:16 PM