नागरिकांना प्राथमिक सुविधा देण्याची जबाबदारी पालिका, नगरपालिका ग्रामीण भागात जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यांची असते. पण शहरी भागातच योजनांचा बोजवारा उडताना दिसतो. मग ग्रामीण भागात काय स्थिती असेल याची कल्पना न केलेलीच बरी. ग्रामस्थांच्या पाठिशी कुणीही ठामपणे उभे राहत नसल्याने दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न त्यांना पडतो. त्यामुळेच अनेक योजना या कागदावरच पूर्ण होतात. अंमलबजावणी होत नसल्याने त्याचा फटका या ग्रामस्थांना बसतो.जिल्हा परिषदेच्या भिवंडी पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागा मार्फत तालुक्यातील १३९ गाव, पाड्यात १००७ हातपंप तर अनगाव, काटई, कवाड, खंबाला, धामणगाव, भोकरी, मैंदे, सापे, दुगाड, निवली, चावे, पारिवली, लोनाड, चिंचवली (कुंदे) सावाद, चाणे, अंबाडी, कूसापूर, सुपेगाव अशा २० ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात २३ वीजपंप आहेत. पाच्छापूर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना, पिसे, धामणगाव, किरवली प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना, वज्रेश्वरी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. मात्र असे असतानाही आजही महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते.भिवंडी शहराजवळ असलेल्या निंबवली ग्रूप ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील देसकपाडा या आदिवासी- कातकरी पाड्यातील नागरिकांना पाण्याची सुविधा नसल्याने डोगंरमाथ्याखाली खड्डा खोदून त्यामधील दूषित पाणी पिण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. तर देसकपाडा दोनमधील ग्रामस्थांना दगडाच्या झऱ्यातून पाझरणारे पाणी भरावे लागत आहे. आधीच अठराविश्व दारिद्रय असणाºया येथील महिलांचा अर्धा दिवस पाण्यासाठी वणवण करण्यातच जातो. मात्र येथील पाणी टंचाईवर मार्ग काढण्यासाठी ना ग्रामपंचायत ना पाणीपुरवठा विभागाकडे वेळच नाही. परिणामी येथील नागरिक पाण्याच्या समस्येने हवालदिल झाले आहेत. तर लाखीवली ग्रामपंचायतीच्या पालिवली गावात पाणी समस्या जाणवत आहे. येथील हातपंपांला पाणी नाही, विहरीही कोरड्या पडल्या आहेत. गाणे ग्रामपंचायतीच्या पाटीलपाडा येथील नागरिकांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या संबंधी गटविकास अधिकारी व पाणीपुरवठा विभागाला माहिती देण्यात आली असल्याचे माजी जि.प. सदस्या संगीता भोमटे यांनी सांगितले. तर पालीवली गावात एप्रिलच्या सुरूवातीलाच महिलांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या बेबी भोईर यांनी सांगितले.तालुक्यातील कवाड ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील विश्वभारतीफाटा, नित्यानंद कॉलनी येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र येथील विहीरी व खाजगी बोअरवेलचे पाणी शेलार येथील खाजगी डाइंग कंपनीला टँकरने पुरवले जाते. या प्रकरणी गेल्यावर्षी भिवंडीच्या तहसीलदार वैशाली लंभाते यांनी खाजगी बोअरवेलचे अधिग्रहीत करून त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले होते. तशी कारवाई यंदा होणार का, प्रशासन टॅकरमाफियांनवर मेहरबान न होता येथील नागरिकांची पाणी समस्या सोडवणार का असे प्रश्न पंचायत समितीचे सदस्य तानाजी लहागे यांनी उपस्थित केला आहे. भरे, कोयना वसाहत, राईपाडा या चावे ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील गावपाड्यातही पाणी समस्या जाणवत आहे. भिवंडी शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्यावर तेथील नगरसेवक, नागरिक रस्त्यावर उतरून सत्ताधाºयांसह पालिका प्रशासनाला जाब विचातात. मात्र ग्रामीण भागात तसे घडताना दिसत नाही.जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. काही लोकप्रतिनिधी हे मासिक सभेत गप्प बसतात. नागरिकांच्या प्रश्नावर ‘ब्र’ही काढत नसल्याने ग्रामीण भागातील समस्या या सुटत नाहीत. महापालिकांना विविध योजनांमधून निधी उपलब्ध होतो त्यामुळे पाणीटंचाई दूर करण्यात फार अडचणी येत नाहीत. दूषित पाणी प्यायल्याने गॅस्ट्रोची लागण होऊन जुनादुर्खी येथील वीटभट्टीवर काम करणाºया नयन मानकर या दोन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला होता.दोषींवर कारवाई शून्यकाही ठिकाणी कामे झालेली नसतानाही कंत्राटदार व पाणीपुरवठा समितीने रक्कम घेऊन सरकारी निधीचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. तर पिलझे ग्रामपंचायतीच्या देपोली व पिळझे, साखरोली, पिळझे, रावते पाडा या नळपाणी पुरवठा योजनांचा विषय सातत्याने ‘लोकमत’ने मांडला होता. अखेर पंचायत समितीच्या पहिल्याच मासिक सभेत शिवसेनेचे गटनेते रविकांत पाटील व सदस्य प्रकाश भोईर यांनी योजना का रखडली याचा जाब पाणीपुरवठा उपअभियंत्यांना विचारत त्यांना धारेवर धरले. परिणामी १५ दिवसात आठ वर्ष रखडलेली पाणी योजना सुरू झाली. निधीचा अपहार करणाºयांवर कुठलीही कारवाई केली नाही. त्याचाच परिणाम योजना पूर्ण होण्यास विलंब लागला.शेतीची कामे मंजूरतालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मालोडी, तळवली, घोटगाव, गोदाडे या गावांमध्ये २०१४ ते २०१७ दरम्यान शेततलाव, शेतीचे बांध, बंदिस्त नाल्यात बंधारा बांधणे या करिता दोन कोटी निधी खर्च केला आहे. तर २०१७ ते २०१८ दरम्यान खालिंग, मैदे, अवलोटे, मोहिली, वारेट, कुरूंद, करंजवडे, धामणे,े चिबिपाडा या गावात शेतीची कामे मंजूर करण्यात आली असून दोन कोटी आठ लाखाचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती प्रभारी तालुका कृषी अधिकारी आबासाहेब वाघचौरे यांनी दिली.योजनांची माहितीच नाहीगेल्या तीन वर्षापासून भिवंडी तालुका कृषी अधिकारी पद हे रिक्त असल्याने कृषी विभागाचे काम रामभरोसे सुरू आहे. प्रभारी तालुका कृषी अधिकारी हे अंबाडी मंडळ अधिकारी आहेत. शेतकºयांना योजनांचा लाभ मिळत नाहीत. पर्यवेक्षक व कृषी सहायक गावपाड्यात जात नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरी योजनांपासून चार कोस लांबच असल्याचे शेतकरी संतोष पाटील यांनी सांगितले.देसकपाड्यात पाणीसमस्या जाणवत आहे. ती दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जि.प. व पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.- गणेश गुळवी,उपसरपंच, ग्रामपंचायत निंबवली.चावे ग्रामपंचायतीच्या भरेगाव, कासपाडा, कोयना वसाहत येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांनी तक्र ारी केल्या आहेत. या संदर्भात २६ एप्रिलला होणाºया मासिक सभेत आवाज उठवणार आहे.- रविकांत पाटील, गटनेते, शिवसेना.तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गाव, पाड्याचा आढावा घेणार आहे. कवाड येथील ग्रामपंचायतीच्या नित्यानंद कॉलनी, विश्वभारतीफाटायेथील पाणी समस्येविषयी टँकरचालक व खाजगी बोअरवेल धारकांवर कारवाई केली जाईल.- शशिकांत गायकवाड, तहसीलदार, भिवंडी.शेलार ग्रामपंचायतीच्या कासपाडा येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. येथे नळपाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. लवकरच त्यातून पाणीपुरवठा सुरू होईल.पंचायतीचे प्रयत्न सुरू आहेत.- संदीप पाटील,सरपंच, शेलार ग्रामपंचायत.३५ बोअरवेल मंजूर झाल्या आहेत. त्या पाणीटंचाईग्रस्त गावात मारण्यात येणार आहेत.- यू. डी. आंधळे, शाखा अभियंता, पाणीपुरवठा.पाणीटंचाई संबंधी आढावा घेऊन योग्य त्या उपायोजना करण्यात येतील.- रवीना जाधव, सभापती, भिवंडी पंचायत समिती.
आमच्यावर नेहमीच दूषित पाणी पिण्याची येते वेळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 3:41 AM