ठाणे : रामदास भटकळ यांनी विपुल लेखन केले. दर्जेदार पुस्तके प्रकाशित केली. त्यांना लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार देताना आम्हीच गौरवीत झालो आहोत,अशा शब्दात लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
लोकमतचे संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांनी ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी ‘लोकमत’ची सुरुवात केली. ते स्वत: ब्रिटिशांच्या कारागृहात पावणेतीन वर्षे होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ‘लोकमत’च्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे जीवन कसे बदलता येईल, प्रगतशील कसे होईल यासाठी त्यांनी लोकमत सुरू केले.
साहित्य पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे. यापूर्वी तीन वर्षे पुण्यात तर आता दुसऱ्या वर्षी ठाण्यात हा सोहळा होतोय. जीवनगौरव पुरस्कार रामदास भटकळ यांना देऊन आम्ही स्वत:ला गौरवित केले. रामदास भटकळ यांनी गांधीजी, कस्तुरबा आणि गांधींच्या विचारांवरील पुस्तके निर्माण केली. भटकळ एक उत्तम साहित्यिक असल्याने त्यांनी निर्माण केलेले साहित्य ते इतिहासाचे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
दीपोत्सवची यशकथा उलगडली -कोलकाता येथे आपण एकदा भेट दिली, तेव्हा तेथील ‘देश’ नावाच्या मासिकाचा खप एक लाख असल्याचे समजले. त्यावेळी आम्ही लोकमत दिवाळी अंकाच्या १५ हजार प्रती प्रकाशित करत होतो. त्याच दिवशी आगळावेगळा दिवाळी अंक काढायचा मी निर्णय घेतला. ज्येष्ठ गीतकार गुलजार यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी दीपोत्सवची जबाबदारी घेतली. कागद, छपाई, लेखनाची शैली बदलून आम्ही दीपोत्सवच्या एक लाख प्रती विकू शकलो. आज आम्ही दीपोत्सवच्या साडेतीन लाख प्रती विकण्याचा टप्पा ओलांडला आहे, असे सांगत त्यांनी दीपोत्सवच्या यशाची कथा पहिल्यांदा सर्वांना सांगितली. उपस्थितांनी त्याला टाळ्यांनी जोरदार दाद दिली.
प्रकाशन व्यवसायाची शंभरी आणि वयाची नव्वदी गाठूनही आपण हेवा वाटावा इतके तरुण आहात, अशा शब्दात डॉ. विजय दर्डा यांनी रामदास भटकळ यांचे कौतुक केले. ७५ वर्षांच्या व्यावसायिक कारकीर्दीत हजारो पुस्तके प्रसिद्ध करताना आपण सतत नाविन्याचा ध्यास घेतला. छापील पुस्तकांखेरीज इतर माध्यमातूनही आपण नवे प्रयोग केल्याचेही डॉ. विजय दर्डा यावेळी म्हणाले.