डोंबिवली : येथील एमआयडीसी भागातील निवासी परिसरात पडलेल्या खड्ड्यांची परिस्थिती वर्षभर कायम राहिली असून आजवर केवळ बैठका आणि आश्वासनांवर बोळवण सुरू असताना खड्ड्यांच्या त्रासाने निवासीकर अक्षरश: नि:शब्द झाले आहेत. अजून किती सहन करायचे, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. गणेशोत्सवाच्या धर्तीवर इतरत्र रस्त्यांची मलमपट्टी सुरू असली, तरी निवासी भागाकडे झालेल्या दुर्लक्षतेमुळे यंदा श्रींचे आगमनही खड्डेमय रस्त्यांवरून होण्याची दाट शक्यता आहे.१ जून २०१५ ला २७ गावे केडीएमसीत समाविष्ट झाली. याआधी महापालिका, नंतर ग्रामपंचायत आणि पुन्हा महापालिका असा प्रवास करताना सुविधा मिळतील, अशी अपेक्षा स्थानिक रहिवासी बाळगून होते. परंतु, त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला असून ही गावे महापालिकेतून वगळण्यात यावी, यासाठी सर्वपक्षीय संघर्ष समितीचा लढा सुरू आहे. या गावांचाच एक भाग असलेला एमआयडीसी निवासी भागही सुविधांअभावी दुरवस्थेच्या गर्तेत सापडला आहे. खड्डेमय रस्ते आणि अस्वच्छता यामध्ये स्थानिक रहिवासी पुरते ग्रासले गेले असून याबाबतचे वास्तव वारंवार केडीएमसीच्या निदर्शनास आणूनही कोणताही फरक पडलेला नाही. गेल्यावर्षी पावसाळ्यात पडलेले खड्डे आजमितीला जैसे थे राहिले असून परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. महापालिकेत येऊन काय मिळाले, ग्रामपंचायतीचा कारभार बरा होता, असे म्हणण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे. असुविधांबाबत नुसत्या बैठका आणि चर्चा घडवल्या जात असून त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. आजघडीला निवासी भागातून जाणारा केडीएमटी बसचा जो मार्ग आहे, त्यावर डांबराचे पॅच मारून तो रस्ता सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु, टाकण्यात आलेल्या डांबरावरील बारीक खडी निघायला सुरुवात झाल्याने पुन्हा त्याठिकाणी खड्डे पडण्याची शक्यता आहे. हे कामही अर्धवट झाले असून गणपती मंदिर ते शेवटच्या बसस्टॉपपर्यंतचे काम अद्याप बाकी आहे. त्यातच, निवासी भागातील अंतर्गत रस्त्यांवर काही ठिकाणी माती आणि खडी टाकून बुजवलेले खड्डेही उखडले गेलेआहेत.दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. याउपरही खड्ड्यांची जैसे थे राहिलेली स्थिती पाहता स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. निवासी भागात दोन ते तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यामधील काही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडूनही खड्ड्यांच्या सद्य:स्थितीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे>नुसत्या चर्चा, अंमलबजावणी शून्यनिवासी भागातील खड्ड्यांबाबत आम्ही वारंवार केडीएमसीला पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु, कोणतीही कृती आजवर महापालिकेकडून झालेली नाही. केवळ बैठकांमधून चर्चा घडतात, त्यावर आश्वासने दिली जातात, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. कितीवेळा चर्चा करायची आणि परिस्थिती निदर्शनास आणून द्यायची. कोणतीच हालचाल होत नसल्याने आम्ही निवासीकर अक्षरश: नि:शब्द झालो आहोत, अशी प्रतिक्रिया सुदर्शननगर निवासी संघ सार्वजनिक उत्सव गणेश मंडळाचे सचिव विवेक पाटील यांनी दिली.किती सहन करायचेगेल्या पावसाळ्यातील खड्ड्यांची अवस्था यंदाही कायम राहिली आहे. दोन महिन्यांपूर्वी महापौर विनीता राणे यांना याबाबत पत्रही दिले आहे. परंतु, कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. महापालिकेकडून काही होणार आहे की नाही, अजून आम्ही किती सहन करायचे? असा सवाल ज्येष्ठ नागरिक वसंत शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.तो कारभार बरा होतानिवासी भागातील रस्ते ग्रामपंचायत काळात सुस्थितीत होते. परंतु, महापालिकेत गेल्यावर त्यांची पुरती दारुण अवस्था झाली आहे. माझ्या कार्यकाळात रस्त्यांची कामे करण्यात आली होती. मात्र, आता दोन वर्षांपासून केवळ आश्वासनेच दिली जात आहेत. पण, सुधारणा काहीच होत नाही. स्थानिक रहिवासी पुरते बेजार झाले आहेत. ग्रामपंचायतीचा कारभार बरा होता, असे त्यांचे म्हणणे आहे, असे मत माजी सरपंच चंद्रशेखर शिंदे यांनी व्यक्त केले.कामे सुरू असल्याचा दावानिवासी भागातील खड्डे भरण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. संपूर्ण डोंबिवली शहरात ही कामे सुरू असल्याने विलंब लागत आहे. एमआयडीसीकडून रस्त्यांच्या बाजूकडील गटारबांधणीच्या कामाची निविदा काढली जाणार आहे. निवासी भागातील प्रमुख रस्त्यांची कामे आपण सुरू केली आहेत. पाऊस लांबल्याने कामे सुरू करायला विलंब लागला, परंतु आता रात्रंदिवस कामे सुरू आहेत, असा दावा केडीएमसीच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांनी केला आहे.
खड्ड्यांच्या त्रासाने आम्ही नि:शब्द!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 3:18 AM