कल्याण : भाजप उमेदवाराविरोधात केलेली बंडखोरी शमवण्यासाठी वाढत असलेल्या पक्षश्रेष्ठींच्या दबावाला कंटाळून पूर्वेतील आणि उल्हासनगरमधील शिवसेना नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फॅक्सद्वारे पाठविले होते. परंतु, त्यापैकी दोन नगरसेविकांनी आम्ही बंडखोरांसोबत नसल्याचे स्पष्ट करून, राजीनाम्याशी आपला संबंध नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक रमेश जाधव यांनीही आपण राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे.शिवसेनेचे बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांच्या समर्थनार्थ कल्याण पूर्व आणि उल्हासनगरमधील २६ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे दोन दिवसांपूर्वीच राजीनामे पाठविले होते. दरम्यान, कल्याण पूर्वेत महायुतीचे उमेदवार गणपत गायकवाड हे असून, बंडखोरांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे पक्षाला फरक पडत नाही. त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, अशा शब्दांत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी इशारा दिला होता. त्यानंतर दुसºयाच दिवशी, शुक्रवारी संगीता गायकवाड आणि ऊर्मिला गोसावी या पूर्वेतील सेना नगरसेविकांनी आमचा राजीनाम्याशी कोणताही संबंध नसल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. पक्षश्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे आम्ही सुरुवातीपासूनच महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत असल्याचा दावा त्यांनी केला. विशेष बाब म्हणजे, माजी महापौर आणि विद्यमान ज्येष्ठ नगरसेवक रमेश जाधव यांनीही राजीनामा दिला नसल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना आपण युतीच्या अधिकृत उमेदवारासोबत होतो, असा दावा जाधव यांनीही केला आहे. याशिवाय, सेनेची आणखी एक नगरसेविका आणि एक युवासेना पदाधिकारीही बंडखोरांसोबत नसल्याचे बोलले जात आहे. परंतु, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे सर्वच्या सर्व नगरसेवकांनी राजीनामे दिल्याचा बंडखोरांचा दावा कितपत खरा आहे, असा प्रश्न उपस्थित आहे.राजीनामा देणाºयांमध्ये सहभागी असलेले सेनेचे पूर्व विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रशांत काळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, पूर्वेत सेनेचे १८ नगरसेवक आहेत. त्यापैकी १६ नगरसेवक आणि उल्हासनगरमधील १० नगरसेवक अशा २६ नगरसेवकांनी राजीनामे पाठवले आहेत. गायकवाड आणि गोसावी यांचा यामध्ये समावेशच नव्हता. ते आधीपासूनच गायकवाड यांचा प्रचार करत असल्याचे सांगून काळे यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
नरेंद्र पवार यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामाकल्याण : कल्याण पश्चिम मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांना पक्षाने विचारणा केली असता, त्यांनी कल्याण पूर्वेतील शिवसेनेच्या बंडखोरीवर बोट ठेवत उमेदवारी अर्ज कायम ठेवला. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केल्यानंतर, गुरुवारी रात्री पवार यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. हा राजीनामा त्यांनी सोशल मीडियावरही व्हायरल केला आहे. महायुतीच्या जागावाटपात भाजपने कल्याण पश्चिमेची जागा शिवसेनेला सोडली. त्यामुळे पक्षाने माझ्यावर अन्याय केला. हा प्रकार कळताच मी १ आॅक्टोबर रोजी पक्षाच्या प्रदेश सचिवपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाला माझ्या अपक्ष उमेदवारीची अडचण होऊ नये, यासाठी पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. निवडणुकीत पवार विजयी झाल्यास पक्ष त्यांना स्वीकारणार की, बंडखोरीच्या मुद्यावर त्यांना लांब ठेवणार, या प्रश्नाचे उत्तर निवडणूक निकालानंतरच मिळू शकेल.मीरा-भार्इंदरमध्ये भाजपला धक्का ! : मीरा रोड : बंडखोर माजी महापौर गीता जैन यांना भाजपमधून काढल्यानंतर दुसºयाच दिवशी, शुक्रवारी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर टीकेची झोड उठवत पक्षाच्या महिला मंडळ अध्यक्षा रीया म्हात्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी जैन यांचा प्रचार सुरू केला आहे. रीया म्हात्रे यांंनी २०१७ ची महापालिका निवडणूक भाजपमधून लढवली होती. शिवसेनेच्या अनिता पाटील यांच्याविरोधात त्यांनी चार हजार ५४९ मते मिळवली होती. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल आपल्याला आदर आहे. मात्र, स्थानिक नेतृत्वाने विश्वासात न घेता स्वत:च्या मर्जीनुसार कामकाज चालवल्याचा आरोप करत रीया म्हात्रे यांनी राजीनामा दिला.