ठाणे : कोरोनाकाळात वर्षभर ज्येष्ठ नागरिक तसेच कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना औषधे घरपोच सेवा, टिफिन सेवा, वैद्यकीय तपासणी सेवा, समुपदेशन सेवा अशा अनेक सेवा देण्याचे कार्य ‘वुई आर फॉर यू’च्या माध्यमातून सुरू आहे. त्याचाच एक पुढचा टप्पा म्हणजे कोरोना लसीकरण मार्गदर्शन व सहाय्य सेवा ही सेवा सुरू केली आहे. ‘घेऊया लसीची साथ, करूया कोरोनावर मात’ असा संदेश त्यांनी दिला आहे.
आदित्य प्रतिष्ठान, ठाणेच्या माध्यमातून किरण नाकती आणि त्यांचे अनेक सहकारी ही सेवा बजावत आहेत. पालिकेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू झाली आहेत. ज्येष्ठ नागरिकांना केंद्रात जाण्यासाठी आधीच्या सर्व प्रक्रिया ‘वुई आर फॉर यू’च्या माध्यमातून सोप्या करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. ऑनलाइन नोंदणी केल्यापासून ते अगदी घरापासून ते लसीकरण केंद्रापर्यंत व केंद्रापासून ते पुन्हा घरापर्यंत नेण्यासाठी मोफत रिक्षा सेवा, त्यादरम्यान प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे हेही काम सर्व ‘वुई आर फॉर यू’ चे सेवेकरी करत असतात. यासाठी मोफत रिक्षासेवेसाठी एकूण दहा रिक्षा नौपाडा विभागातील ज्येष्ठ नागरिक व रुग्णांसाठी सज्ज आहेत. या सेवेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लसीकरणासाठी आपल्या संस्थेच्या माध्यमातून एक चांगली सेवा देता येईल, अशा भावना नाकती यांनी व्यक्त केल्या. सर्वच ज्येष्ठ नागरिकांना या सेवेचे स्वागत केले व आजपर्यंतच्या सेवेचे खूप कौतुक केले व आभार मानले. यासाठी नाकती यांच्यासोबत विजय डावरे, राजू सावंत, रमाकांत चौधरी, ऋषिकेश केदार, संभाजी आंद्रे, महेश सुतार, सतीश राऊत, गजानन परब, प्रशांत भरणे व असे अनेक सेवेकरी कार्यरत आहेत.
------------------------------------
फोटो मेलवर
१४ ठाणे वुई फाॅर यू