ठाणे : कोणताही पक्ष हा धुतल्या तांदळासारखा नाही. काँग्रेसचे उतारे आता भाजपमध्ये आले आहेत. प्रत्येकाला आपल्या संपत्तीच्या चौकशीची भीती आहे. ‘शूर आम्ही आमदार आम्हाला फक्त ईडीची भीती’ असे विडंबन काव्य विडंबनकार रामदास फुटाणे यांनी मंगळवारी सादर केले.आत्रेय आयोजित साहित्यसम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त फुटाणे यांना आचार्य अत्रे मानचिन्हाने गौरविण्यात आले. गडकरी रंगायतनमध्ये मंगळवारी हा सोहळा पार पडला. यावेळी फुटाणे म्हणाले की, आज परिस्थिती इतकी विचित्र झाली आहे की, आज अत्रे असते तर सर्वांना झोडपले असते. आज त्यांच्या लेखणीची गरज होती, पुन्हा एकदा मराठ्याची गरज होती. देशात अस्थिरता असून हिंसाचार वाढला आहे.प्रत्येक पक्षातील तरुण पिढी हिंसक झाली आहे, उद्या निवडणुकीत काय घडेल हे सांगता येत नाही. कारण माणसातले जनावर जागे झाले आहे आणि हे पशुत्व वाढवण्यात प्रत्येक पक्षाचा हात आहे. हल्ली कोण कोणत्या पक्षाचा आहे हे राजकारणात असूनही मला कळत नाही. काही सकाळी एका पक्षात तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षात असतात. सगळ््या पक्षातल्या लोकांची भूक सारखीच आहे. देशातील अस्थिरतेमुळे जात, धर्म मजबूत झाले आहेत. आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. अंबानीच्या मुलाच्या लग्नाला होणा-या खर्चाचे आकडे मोजण्यासाठीच आपण जन्माला आलो की काय असे वाटत आहे. या लोकांना झोडपणार कोण म्हणून अत्रेंची आठवण होते. वर्तमानपत्रात पहिल्या पानावर स्वप्न विकणाऱ्यांची गर्दी झाली आहे. निर्भय पत्रकारितेची गरज असताना वृत्तपत्र, चॅनेलमध्ये कोणता संपादक ठेवायचा हे फक्त दोनच लोक ठरवतात.अत्रे यांनी ओघवत्या मराठी भाषा शैलीत लेखन केल्याचे नमूद करुन फुटाणे म्हणाले की, साहित्यिकांचीच मुले मराठीपासून दूर चालली आहेत. साहित्यिकांचीच मुले मराठी वाचत नाहीत. मराठीची अवस्था वाईट झाली असून मराठीचा पुन्हा जागर करण्यासाठी साहित्यिकांनी एकत्र येण्याची गरज आहे.ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत आणि मधुकर भावे यांनी अत्रेंच्या आठवणी सांगितल्या. यावेळी आ. प्रताप सरनाईक, अत्रेंच्या कन्या मीना देशपांडे, अत्रेंचे नातू राजेंद्र पै, प्रकाशक अशोक मुळ््ये उपस्थित होते. यावेळी आचार्य अत्रे लिखित ‘हंशा आणि टाळ््या’, ‘आमदार अत्रे’, ‘अत्रे वेद अत्रे विचार’, ‘अत्रे वंदन’, शिरीष पै लिखित ‘माझे नाव हायकू’ आणि मीना देशपांडे लिखित ‘अश्रूंचे नाते’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
...आम्हाला ईडीची भीती - रामदास फुटाणे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 1:52 AM