ठाणे : पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांच्या २०१४ मधील विजयानंतर देशभरातील वातावरण बदलले. देशाला वेगळा विचार आणि पारदर्शक कारभार देण्याबरोबरच जनतेला संवाद साधणारा पंतप्रधान मिळाला. त्यांचे कार्य जनतेमध्ये रुचल्यामुळेच भाजपाला यश मिळत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर यांनी रविवारी येथे केले.
पंतप्रधान मोदी यांच्या बारा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री व आठ वर्ष पंतप्रधान या २० वर्षांच्या कारकिदीर्तील प्रमुख वैशिष्ट्ये, सामान्य जनतेविषयी घेतलेले विविध कल्याणकारी निर्णय आदींचा लेखाजोखा खासदार जावडेकर यांनी ठाण्यात घेतला. सहयोग मंदिरात झालेल्या कार्यक्रमाला आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, माधवी नाईक, संदिप लेले, बुद्धिजिवी प्रकोष्ठच्या प्रदेशाध्यक्षा जयश्री चित्रे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
गेल्या २० वर्षात मोदी एकदाही आजारी न पडता, ते सातत्याने कार्य करीत आहेत. मोदींकडून वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम आणि योजना हाती घेतल्या जात आहेत. हर घर तिरंगाच्या माध्यमातून देशभरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले. व्हीआयपी कल्चर, कागदपत्रे अॅटेस्टेड आदी ब्रिटीश काळापासून सुरू असलेली संस्कृती एका दिवसात रद्द केली. गेल्या आठ वर्षात रेल्वे गेटवर अपघात झाला नाही. निवृत्तांना जीवन प्रमाण देण्याची पद्धत डीजीटल झाल्यामुळे, लाखो निवृत्तांना दिलासा मिळाला, असे प्रतिपादन जावडेकर यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपाचे ११ कोटी सदस्य झाले असून, तो जगातील सर्वात मोठा पक्ष झाला. कल्याणकारी निर्णयांमुळे गरजू कुटुंबांना घर, पाणी, अन्न-धान्य, गॅस, घरात स्वच्छतागृहे आणि मोफत उपचार केले गेले. त्यामुळे अनेक गृहिणी भाजपाच्या कार्यकर्त्या झाल्याचेही ते म्हणाले. विरोधकांनी २०२४ च्या निवडणुकीची चिंता न करता २०२९ च्या निवडणुकीची चर्चा करावी, असा टोला प्रकाश जावडेकर यांनी मारला. मोदी यांच्या कारकिर्दीवरील मोदी २० पुस्तक हे अभ्यासपूर्ण आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीने ते वाचावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पाकिस्तानातून प्रथमच वैमानिक जिवंत परतलायापूर्वी भारतातून पाकिस्तानच्या सीमेत गेलेला सैनिक पुन्हा जिवंत परत येत नसे. मात्र, वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना अवघ्या २४ तासांत पुन्हा भारतीय भूमीत आणण्यात भारताला यश आले. पुलवामाच्या हल्ल्यानंतर ैसर्जिकल स्ट्राईक' करून धडा शिकविला गेला. त्यामुळे दहशतवाद्यांनाही आळा बसला. गेल्या आठ वर्षांत भारतात कोठेही बॉम्बस्फोट झाले नाहीत, याकडे जावडेकर यांनी लक्ष वेधले.