ठाणे : मनसुख हिरेन हे आमचे मालक होते. ते मनाने खंबीर होते. ते आत्महत्या करतील, असे अजिबात वाटत नाही. जे झाले, ते अत्यंत वाईट झाले, अशी प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांच्या दुकानातील कर्मचाऱ्याने ‘लोकमत’जवळ रविवारी व्यक्त केली. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर आता आपल्याला यावर काही बोलायचे नसून, दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) यांच्या तपासावर पूर्ण विश्वास असल्याचे मत मनसुख यांचे भाऊ विनोद हिरेन यांनी व्यक्त केले.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अंटेलिया इमारतीजवळ मिळालेल्या स्फोटकांच्या स्कॉर्पिओ कारसंबंधीच्या आरोपांची एनआयएचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला, पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने शनिवारी मुंबईच्या विशेष शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांना शनिवारी उशिरा अटक झाली. गेले अनेक दिवस सातत्याने मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात वाझेंचाच हात असल्याचा आरोप मनसुख यांच्या पत्नी विमला तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
याच पार्श्वभूमीवर या कुटुंबाची भेट घेण्याचा प्रस्तुत प्रतिनिधीने प्रयत्न केला. तेव्हा एटीएस आणि एनआयए या तपास यंत्रणांकडून योग्य प्रकारे काम सुरू आहे. या यंत्रणांवर विश्वास आहे. मात्र, वाझेंच्या अटकेबद्दल प्रतिक्रिया द्यायची नसल्याचे मनसुख यांचे भाऊ विनोद हिरेन यांनी स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वी एनआयएने याप्रकरणी आपल्याकडे तसेच विमला यांच्याकडे चौकशी केल्याचे ते म्हणाले. एटीएसच्या पथकांनी गेल्या आठवडाभरात अनेकदा चौकशी केल्याचेही त्यांनी सांगितले.
‘विजय पाम्स’मध्ये येण्यास बंदी; कुटुुंबीयांना भेटण्यास साेसायटीकडून मनाई- मनसुख हिरेन कुटुंबीय वास्तव्याला असलेल्या ठाणे, खोपट भागातील विजय पाम्स या इमारतीत भाजपच्या स्थानिक आमदारांसह अनेक राजकीय व्यक्तींनी भेट देऊन हिरेन कुटुंबाशी संवाद साधला. नौपाडा पोलीस ठाण्यातील पाच पोलिसांचे सशस्त्र संरक्षणही या कुटुंबाला दिले आहे. मात्र, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या इमारतीत प्रवेशास व कुटुुंबीयांना भेटण्याला सोसायटीने तसेच हिरेन कुटुंबीयांनी मनाई केल्याचे सोसायटीच्या सुरक्षारक्षकांनी सांगितले. त्यामुळे वाझे यांच्या अटकेनंतर विमला हिरेन किंवा त्यांच्या मुलाची मात्र प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
- ठाण्यातील वंदना सिनेमागृहासमोरील ‘क्लासिक कार डेकोर’ या मनसुख यांच्या दुकानातील दीपक सोनी या कर्मचाऱ्याने मात्र मनसुख यांच्या मृत्यू प्रकरणाबद्दल खेद व्यक्त करीत आपले मालक आत्महत्या करूच शकत नसल्याचा दावा केला. त्याचवेळी ग्राहक म्हणून इथे अनेकजण येतात; पण सचिन वाझे यांना आपण ओळखत नसल्याचेही त्याने सांगितले. मालक आणि वाझे यांचे वैयक्तिक पातळीवर काही संबंध असतील तर याबाबत आपल्याला माहिती नाही, असेही तो म्हणाला. मनसुख यांच्या मृत्यूनंतर ९ मार्चपासून हे दुकान पुन्हा सुरू झाले. या दुकानात अन्य चार कर्मचारी असून, मनसुख यांचा मोठा मुलगा मित हा घरूनच सध्या रोजच्या व्यवहाराची माहिती घेत असल्याचेही या कर्मचाऱ्याने सांगितले.