ठाणे : ठाणे महापालिकेने अवघ्या २४ तासात जोशी- बेडेकर महाविद्यालय ताब्यात घेतल्यामुळे महापालिकेच्या निर्णयाविरोधात डॉ. विजय बेडकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. परंतु आम्ही नियमानुसारच महाविद्यालय ताब्यात घेतले असल्याची माहिती महापालिका आयुक्त विजय सिघंल यांनी दिली आहे. कोरोनाच्या संकटात लोकांचे हित सर्वात महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.सिंघल म्हणाले की, सध्याची परिस्थिती पाहता शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच आम्ही पावले उचलत आहोत, त्यामुळे या कामी सर्वांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. काही दिवसापूर्वी महापालिकेने ठाणे स्टेशन सिडको परिसरातील जोशी-बेडेकर महाविद्यालय क्वारंन्टाईन सेंटरसाठी ताब्यात घेतले. हा निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतले नाही, याबाबत नाराजी व्यक्त करताना डॉ. बेडेकर यांनी आपला लढा निर्बुद्ध अधिकारशाहीविरुद्ध असल्याचे ठणकावून सांगितले. त्यावरुन आता चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. पालिकेने अवघ्या २४ तासाची नोटीस देत महाविद्यालय ताब्यात घेतले ही पध्दत चुकीची असल्याचे सांगत बेडेकर यांनी याचिका दाखल केली आहे.सिंघल म्हणाले की, आम्ही कोणतेही नियमबाह्य काम केलेले नाही. अत्यावश्यक कामाच्या वेळी आपण शैक्षणिक वास्तू वापराकरिता ताब्यात घेऊ शकतो, असे शासनाचे निर्देश आहेत. सध्या महापालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्या दृष्टीकोनातून आपल्याला अशा शैक्षणिक वास्तुंची गरज भविष्यात लागू शकते. त्या हेतूने आपण हे पाऊल उचलले आहे. लोकांच्या भल्यासाठीच आम्ही हे काम केलेले आहे. एपिडेमिक अॅक्ट अंतर्गत आम्ही ही कारवाई केलेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर आम्हाला क्वारन्टाईन सेंटर किंवा आयसोलेशन सेंटर उभी करणे अत्यावश्यक आहे. नागरीकांचे हित आमच्यादृष्टीने सर्वात महत्वाचे आहे. अशाच नोटिसा देऊन इतर शाळाही आम्ही ताब्यात घेतल्या असल्याचे त्यांनी सांगितले.शाळा, महाविद्यालयांतील विलगीकरण केंद्राला मनसेने केला विरोधठाण्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून क्वारंटाइन सेंटर सुरु करण्यात येत आहेत. या प्रक्रियेलाच मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी विरोध केला आहे. उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या दिवशी मंत्रालयात सर्व मंत्री, अधिकारी आणि कर्मचारी येतील, त्याच्या दुसºया दिवशी शाळा सुरू करा, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे.ठाण्यात शुक्रवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे आदी उपस्थित होते. महापालिकेने जोशी, बेडेकर कॉलेज क्वारंटाइन सेंटर म्हणून ताब्यात घेतले आहे. याविरोधात बेडेकर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मनसेही आता महापालिकेच्या या निर्णयाविरोधात मैदानात उतरली आहे. शैक्षणिक संस्थांपेक्षा मोठे हॉल ताब्यात घ्यावेत, असे ते म्हणाले.
CoronaVirus News: ‘बेडेकर महाविद्यालय नियमानुसारच ताब्यात घेतले’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 1:36 AM