अंबरनाथ: निवडणुका लागल्यानंतर आता भाजपाचे सगळेच नेते गोड बोलू लागले आहेत. पंतप्रधान देखील आता प्रचंड गोड बोलत असून त्यांना निवडणुकीसाठी महाराष्ट्र लागतो आणि व्यवसायासाठी गुजरात लागतो अशी टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा अंबरनाथ पासून सुरू केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केली. किमान पंतप्रधानांनी घराणेशाहीवर काहीही बोलू नये. ते आमच्या घरावर बोलत असतील तर आम्ही देखील त्यांच्या घरावर बोलू असे म्हणत पंतप्रधानांना टार्गेट केले. गद्दारांची घराणेशाही संपवल्याशिवाय खरा शिवसैनिक गप्प बसणार नाही. जे जे देशभक्त आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत असे म्हणत यावेळी उपस्थित असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आणि वंचितच्या कार्यकर्त्यांना एकसंघ राहण्याच आवाहन केले. राम मंदिर आणि राम मंदिराची पूजा ही राष्ट्रीय अस्मितेचा विषय असून त्यासाठी राष्ट्रपतींना हातून पूजा करणे गरजेचे होते. मात्र राम मंदिराच्या आड निवडणुकीचा प्रचार काही लोक करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कल्याण लोकसभा मतदारसंघ हा निष्ठावंत शिवसैनिकांचा बालेकिल्ला असून तो बालेकिल्ला शाबूत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर असल्याचे भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. या मतदारसंघात असलेली गद्दारांची घराणेशाही संपवली गेलीच पाहिजे असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. महापालिका आणि नगरपालिका च्या निवडणुका घेण्यासाठी देखील सरकार घाबरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी खासदार संजय राऊत, खासदार राजन विचारे, राजेश वानखेडे, अजित काळे, संदीप पगारे, जाणू मानकर, काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील, सदाशिव पाटील, कबीर गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.