ठाणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत गोरगरिबांचे प्रचंड हाल झाले होते. अशातच वुई टुगेदर फाउंडेशनने सुरू केलेली धान्य बँक गरजूंच्या पाठिशी धान्यरूपाने उभी राहिली. पहिल्या लाटेत धान्य बँकेने १४ हजार किलो धान्याचे वाटप केले. आता दुसऱ्या लाटेतही धान्य बँक गरजूंना मदत करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी बँकेची पूर्वतयारी सुरू आहे.
कोरोनाशी सगळे जग लढत असताना आपलाही खारीचा वाटा उचलण्यासाठी वुई टुगेदर फाउंडेशन धान्य बँकेच्या महिला आता पुन्हा एकदा सज्ज झाल्या आहेत. गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या अत्यंत कठीण काळात धान्य बँकेच्या माध्यमातून काही समाजसेवी संस्थांच्या मदतीने जवळपास १४ हजार किलो धान्याचे वाटप केले. एका कुटुंबाने एका गरजू कुटुंबाचे पालकत्व घ्यायचे या तत्त्वावर संस्थेने काम केले. या लॉकडाऊनमध्ये देहविक्रय करणाऱ्या महिला, सिग्नलवरचे भिक्षेकरी, तृतीयपंथी, कचरा वेचक या सगळ्यांच्या कठीण काळात त्यांना आधार देण्याचा मानस असल्याचे संस्थेच्या उज्ज्वला बागवाडे यांनी सांगितले.
उत्पन्नाच्या सगळ्या वाटा बंद झाल्या असताना अन्नासाठी कोणालाही दाही दिशा फिरायला लागू नये, याच ध्येयाने धान्य बँकेच्या महिला गेली अनेक वर्षे काम करीत आहे, असेही त्या म्हणाल्या. या सामाजिक कामासाठी प्रत्येक कमावत्या नागरिकाने धान्य बँकेत कमीत कमी १ हजार रुपये जमा करून धान्यदानात सामील व्हा, असे आवाहन संस्थेने केले आहे. विशेष म्हणजे धान्य बँक कुठल्याही परिस्थितीत रोख पैशाचा व्यवहार करत नाही. दात्यांनी केलेली मदत फक्त ऑनलाइन स्वरूपातच स्वीकारली जाते. तसेच, तिही फक्त धान्य रूपातच घेतली जाते.