प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : दसरा जवळ आला की तीन दिवस आधी रानात जाऊन आंब्याच्या डहाळ्या जमा करायच्या, शेतातून भाताची रोपं आणायची अन् भिवंडीवरून टेम्पोत माल टाकून आणायचा. ठाण्यात यायला ३५० रुपये गाडीभाडे लागते. इथे आल्यावर ५० रुपये किलोने झेंडूची फुले विकत घ्यायची आणि रात्रभर त्याच्या माळा करत राहायचे. येताना भाकरीचे आणलेले गाठोडे सोडून दुपारी भाकर खायची अन् दुसऱ्या दिवसापर्यंत फक्त पाण्यावर राहायचं, कारण कमाई किती होईल त्याचा ठाव नाय. ५० रुपयांची माळ अनेक जण घासाघीस करून ३० रुपयांना घेतात. त्यामुळे नफा जेमतेम ५०० ते १,५०० रुपयांपर्यंच होतो, अशी व्यथा मांडली भिवंडीच्या ग्रामीण भागातून आलेल्या आदिवासी महिलांनी.
नातवंडं, सुना, मुलांसह आलेल्या या महिला ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत म्हणजे जांभळी मार्केट येथील जुन्या महापालिकेच्या शेजारी फुटपाथलगत झेंडूची तोरणं विकण्यासाठी आल्या होत्या. शेकडो कुटुंबे दसऱ्याच्या निमित्ताने दरवर्षी ठाण्यामध्ये येतात. पोटापाण्याला चार पैसे अधिक मिळतील, या आशेने ही कुटुंबे येथे दोन दिवस आधी येऊन बस्तान मांडतात. एरव्ही वीटभट्टीवर काम करणारा हा कामगार वर्ग. काही महिलांनी कल्याण येथून झेंडूची फुले आणली होती, तर काहींनी ठाण्यातील होलसेल बाजारातून विकत घेतली.
दोन रात्री जागलो तेव्हा...
माल खपलाच नाही तर खाणार काय म्हणून दिवसभर आम्ही उपाशी राहतो. हार करण्यासाठी रात्रभर जागतो. दोन रात्री जागलो तेव्हा कुठे माळा तयार झाल्या. सकाळी ग्राहक कितीही वाजता माळा घ्यायला आले तर त्या तयार ठेवाव्या लागतात. कुणी बिस्कीट किंवा काही खायला आणून दिले की ते खातो. जी कमाई होईल ती घरी घेऊन जातो. तेव्हा कुठे आमचा सण साजरा होतो, असे आदिवासी महिलांनी सांगितले. माल जोवर संपत नाही तोवर या महिला दिवसरात्र उभ्या राहून माळा विकत असतात.
यावेळेस फारशी कमाई झाली नाही. कमी पैशांत लोक माळा विकत घेतात. आम्ही आदल्या दिवशी येतो अन् याच जागी झोपी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता एसटीने घरी निघून जातो. - कांता नानकर, फुल विक्रेत्या.
काही दिवस आधी शेतात झेंडूची फुले लावली होती, पण टेम्पोतून येताना फुले चेंबल्यामुळे ती खराब झाली. नाइलाजाने दोन टोपल्या मला फेकून द्याव्या लागल्या. ठाण्याच्या होलसेल बाजारातून झेंडूची फुले आणून दिवसरात्र बसून इथे माळा तयार केल्या; पण कमाई काही फारशी होत नाही. जी काही होईल ती घेऊन आम्ही आमच्या गावाला जातो. - कुसुम काकड, शेतकरी