मीरा रोड : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी दहिसर टोलनाका बंद करण्याचे आश्वासन भाजप-शिवसेनेने दिले होते. अगदी आंदोलनाची नौटंकीही केली होती. पण, हा टोलनाका आजही कायम असल्याची टीकेची झोड काँग्रेस आघाडीचे उमेदवार मुझफ्फर हुसेन यांनी उठवली आहे. आपण निवडून आल्यावर दहिसरचा टोलनाका कायमचा बंद करून या जाचातून नागरिकांची सुटका करण्यास प्राधान्य देऊ, असे आश्वासन मुझफ्फर हुसेन यांनी नागरिकांशी संवाद साधताना दिले.
मीरा-भार्इंदर शहराला लागूनच असलेल्या मुंबई शहरात येजा करण्यासाठी मीरा-भार्इंदरकरांना दहिसर टोलनाक्यावर टोलचा भुर्दंड सहन करावा लागतो. युतीचे सरकार असतानाच मुंबईतील उड्डाणपूल बांधण्याच्या आड या टोलनाक्यांचे भूत नागरिकांच्या मानगुटीवर बसवण्यात आले. आज मुंबईतील रस्ते व उड्डाणपुलांची खड्डे आणि वाहतूककोंडीने दुरवस्था झालेली असताना टोलवसुली मात्र नागरिकांकडून सुरूच असल्याची टीका मुझफ्फर यांनी केली.
गत विधानसभा निवडणुकीवेळी युतीने मुंबईच्या प्रवेशद्वारावरील सर्वच टोलनाके बंद करण्याचे आश्वासन दिले होते. पण, आजतागायत मुंबई प्रवेशद्वारावरील एकही टोलनाका युतीने बंद केला नसल्याकडे मुझफ्फर यांनी यावेळी लक्ष वेधले. मुळात भाजप-शिवसेनेची टोलनाका बंद करण्याची मानसिकताच नाही. त्यांना टोलनाक्यांआड नागरिकांची लूट करण्यातच स्वारस्य असून, आपण निवडून आल्यावर टोलनाका कायमचा बंद केल्याशिवाय राहणार नाही, असे मुझफ्फर म्हणाले.