भिवंडी : देशात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे महिमामंडन होईल. औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन होऊ देणार नाही. जो कोणी करण्याचा प्रयत्न करेल त्याला चिरडून टाकू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिला. ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारले त्याच्याच कबरीचे दुर्दैवाने राज्य सरकारला संरक्षण करावे लागत आहे, अशा शब्दांत त्यांनी खेद व्यक्त केला.
भिवंडीतील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, ५० वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीस संरक्षितस्थळ घोषित केल्याने त्याच्या रक्षणाची जबाबदारी राज्य शासनाची आहे हे आमचे दुर्दैव आहे.
भिवंडीतील हे शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य मंदिर हे सर्वांना प्रेरणा देणारे आहे. या स्थळाला राज्य शासनाकडून पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करू, अशी घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली. केंद्राकडून १२ किल्ले जागतिक वारसा यादीत यावे, अशी मागणी युनेस्कोकडे केली आहे. तसेच संगमेश्वरच्या वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असून वढू, तुळापूर, आग्रा, पानिपत येथे प्रेरणास्थळ होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.