राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याबाबत कॉमेडियन कुणाल कामरा याने गाण्याच्या माध्यमातून केलेल्या टीकेमुळे शिवसेना शिंदे कमालीचा आक्रमक झाला आहे. कुणाल कामराने केलेल्या या टीकेनंतर शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी त्याच्या शोच्या सेटवर धडक देत सेटची मोडतोड केली. त्यानंतर आता आज सकाळी ११ वाजता कुणाल कामरा याची धुलाई करणार असल्याचा इशारा, शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी दिला आहे.
संजय निरुपम यांनी काल रात्री यासंदर्भात एक ट्विट केलं होतं, त्यात ते म्हणाले की, आज सकाळी ११ वाजता कुणाल कामराची धुलाई करणार, असं विधान निरुपम यांनी केलं आहे.
तसेच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने कुणाल कामराविरोधात अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर कुणाल कामराच्या सेटची मोडतोड केल्या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल कनाल आणि कुणाल सरमळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणी ४० शिवसैनिकांविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
कॉमेडियन कुणाल कामरा याने एका कॉमेडी शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना एक गाणं म्हटलं होतं. हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. कुणाल कामरा याने या गाण्यातून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपाला दिलेल्या पाठिंब्याचा आणि गद्दारीचाही उल्लेख केला होता. यावरून शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे.