लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : ‘मास्क घाला आणि कोरोना टाळा’, असे घोषवाक्य कोरोनापासून वाचण्यासाठी सरकारकडून तयार केले गेले. मात्र, आजही मास्क घालण्याविषयी कल्याण-डोंबिवलीत अनास्थेचे वातावरण आहे. लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कारवाईनुसार २१ लाख रुपये दंड वसुली महापालिकेने मास्क न घालणाऱ्यांकडून केली आहे. एप्रिल महिन्यात चार हजार ३४२ जण विनामास्क फिरताना आढळले. कोरोनाची पहिला लाट आली तेव्हापासून मास्क न घालणाऱ्यांविरोधात महापालिकेची कारवाई सुरू आहे. कोरोनाची पहिली लाटही एका व्यक्तीच्या जिवावर घाला घालत होती. आता दुसरी लाट इतकी भयानक आहे की, कुटुंबातील अनेक व्यक्ती कोरोनाच्या विळख्याने मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे मास्कचे महत्त्व दुसऱ्या लाटेत महत्त्वाचे ठरले आहे. एकीकडे मास्क घालण्याविषयी काही नागरिकांमध्ये बेफिकिरी आहे, तर दुसरीकडे काही एक नव्हे तर चक्क दोन मास्क एकावर एक घालून कोरोनापासून बचावाचा प्रयत्न करीत आहेत. दुसऱ्या लाटेत डबल मास्कचा वापर सुरू झाला आहे.
पहिल्या लाटेत केवळ मास्क घाला असे सांगणारे प्रशासन आता डबल मास्क घाला, असे आवाहन करीत आहे. या आवाहनाना काही सुज्ञ नागरिकांकडून प्रतिसादही चांगला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी नागरिकांनी मास्क वापरल्यामुळे पॉझिव्हिटी रेट कमी झाला असल्याचे सांगण्यात आले होते तसेच रुग्णसंख्याही कमी झाल्याचा दावा करण्यात आला.
---
कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी मास्क हाच पर्याय
कोरोना रोखण्यासाठी मास्क ही ढाल आहे असे म्हटले जाते. ते खऱ्या अर्थाने अतिशय समर्पक आहे. ज्यांना कोरोनाची संशयित लक्षणो आहेत, त्यांनी मास्क घातल्यास त्यांच्याकडून इतरांना संसर्ग होणार नाही, तर ज्यांना कोरोना झालेला नाही त्यांनी मास्क घातल्यास त्यांना संसर्ग होणार नाही. एकदा वापरता येण्याजोगा मास्क, एन-९५ मास्क, कापडी मास्क असे विविध प्रकारचे मास्क आहेत. सुरुवातीला एकदा वापरून फेकून देणाऱ्या मास्कची चलती होती. आता मास्कचा दैनंदिन वापर सक्तीचा झाल्याने कापडी मास्कवर अधिक भर आहे.
----------
मास्क कसा वापरावा
- मास्कने तुमचे नाक, तोंड आणि हनुवटी झाकली गेली पाहिजे. मास्क चेहऱ्यावर घट्ट बसला पाहिजे.
- यूज ॲण्ड थ्रो हे मास्क एकदाच वापरून कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यावे. ते फेकताना त्याचे दोन तुकडे करून फेकल्यास त्याचा पुनर्वापर होणार नाही.
- कापडी मास्क वापरत असाल तर तो दररोज गरम पाण्याने धुवून घेतला पाहिजे. आता तर कोरोनाची भयावह दुसरी लाट असल्याने डबल मास्क घालण्याचा सल्ला दिला जात आहे.
----
हे करा
सर्जिकल मास्क वापताना त्यावर जंतुनाशक फवारणी करावी.
कापडी व सर्जिकल मास्क वापरणे शक्य नसल्यास हातरुमालाचा वापर करता येऊ शकतो. श्वसनाचे उपचार करणाऱ्या डॉक्टरकडे काम करणाऱ्यांनी मास्कचा वापर करावाच. कफ, ताप, सर्दी असलेल्यांनी संसर्ग पसरू नये म्हणून मास्कचा वापर करावा.
-डॉ.प्रतिभा पानपाटील
-------------
हे करू नका
मास्क घालता आणि काढताना इतत्र कुठेही हात लावू नये. लावल्यास हात साबनाने धुवून घ्यावेत अथवा सॅनिटायझरचा वापर करावा.
खोकताना आणि बोलताना मास्क खाली करू नये. कापडी मास्क हा इतर कपड्यांमध्ये धुण्यासाठी टाकू नये.
डॉ.अश्विनी पाटील
--------------
एकूण रुग्ण- १,२३,४३१
बरे झालेले रुग्ण- १,१४,५५३
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण- ८,०९०
होम आयसोलेशनमधील रुग्ण-६,७९३
मृत्युदर- १.१९ टक्के
पॉझिटिव्हिटी रेट- ११ टक्के
---------------