- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका आयुक्तांच्या आदेशाला प्रभाग अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याने, शहरात अवैध बांधकामाला ऊत आला. आयुक्तांनी बांधकाम नियंत्रक पद रद्द करून अवैध बांधकामाला संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार असल्याचा आदेश गेल्या महिन्यात काढला होता.
उल्हासनगर अवैध बांधकामाबाबत कुप्रसिद्ध असून स्थानिक नेते, महापालिका अधिकारी, भूमाफिया यांच्या संगनमताने अवैध बांधकामे उभे राहत असल्याची टीका होत आहे. गेल्या महिन्यात अवैध बांधकामाच्या तक्रारी वाढल्या नंतर आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी शहर बांधकाम नियंत्रक पद रद्द केले. अवैध बांधकामाला प्रभाग अधिकारी यांना जबाबदार धरण्यात आले. प्रभाग अधिकाऱ्यांनी आपआपल्या क्षेत्रातील अवैध बांधकामाची इतभूत माहिती संबंधित उपायुक्त यांना द्यावी. उपायुक्तांनी अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांना बांधकामाची माहिती दिल्यावर, त्यांनी सदर बांधकामाची माहिती आयुक्तांना द्यावी, असे आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत अवैध बांधकामाची माहिती प्रभाग अधिकाऱ्यांनी दिली नाही, अशी माहिती उपायुक्त मदन सोंडे यांनी दिली.
एकूणच महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याने आरसीसीसह असंख्य अवैध बांधकामे उभी राहिल्याची चर्चा शहरात रंगली. काही वर्षांपूर्वी अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर, राज्य शासनाने विस्थापिताचे शहर म्हणून अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी सन २००६ साली विशेष अध्यादेश काढला. मात्र अध्यादेशाचे काम ठप्प पडल्यावर, गेल्या वर्षी तत्कालीन आयुक्तांनी शासनाच्या आदेशानुसार बांधकामे नियमित करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागितले होते. महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शेकडो नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केले. तसेच प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्जा सोबत एक हजार रुपये जमा केले. दरम्यान कोरोना महामारी आल्याने, बांधकाम नियमित करण्याची प्रक्रिया ठप्प पडली असून बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी होत आहे.
बांधकामे व प्रभाग अधिकाऱ्यावर कारवाई कधी? महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर चक्क आरसीसीचे बहुमजली असंख्य अवैध बांधकामे कोणाच्या आशीर्वादाने उभे ठाकली. असा प्रश्न विचारला जात आहे. प्रभाग अधिकारी अजय एडके, अनिल खतूराणी, अजित गोवारी, तुषार सोनावणे यांच्यासह अवैध बांधकामावर महापालिका आयुक्त काय कारवाई करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.