कल्याण : लग्न सभारंभ आणि पार्ट्यांमुळे कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याची कबुली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. येत्या १० दिवसांत परिस्थिती न बदलल्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा सूर्यवंशी यांनी दिला आहे.
मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव मनपा हद्दीत सुरू झाला. त्यावेळी डोंबिवलीतील एका लग्न सभारंभातून कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. आता पुन्हा मनपा हद्दीत लग्न सभारंभ आणि पार्ट्या जोमात सुरू आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. शहरात होणारे लग्न समारंभ, पार्ट्या आणि सोशल गॅदरिंगवर मनपासह पोलिसांची करडी नजर आहे. यापूर्वी मनपाच्या पुढाकाराने सोशल गॅदरिंगप्रकरणी तीन जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, सोशल गॅदरिंग शहरात कमी असले तरी आता लग्नसराई आहे. कोरोना असला तरी नातेवाइकांच्या लग्नासाठी कल्याण-डोंबिवलीतील नागरिक जैयपूर, अहमदाबाद, अमरावती, इंदौर येथे जात आहेत. तेथून परतल्यावर त्यांची चाचणी केल्यास ती पॉझिटिव्ह येत आहे. परिणामी नागरिकांनी लग्न सभारंभ आणि पार्ट्यांमध्ये सहभागी होणे टाळावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणार
- कोरोनाची वाढती संख्या रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात येणार आहे. एका रुग्णामागे २० जणांची कोरोना चाचणी केली जाणार आहेत.
- तसेच एका इमारतीत कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्यास इमारतीमधील सर्वच रहिवाशांची रॅपिड ॲण्टिजेन चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी इमारतीमधील रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले जात आहे.
- रॅपिड ॲण्टिजेन चाचणीचेही प्रमाण वाढविले जाणार आहे. मनपा हद्दीत ३२ टेस्टिंग सेंटर आहेत. तेथे दोन्ही प्रकारच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. मागील १० दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी न झाल्यास कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
-------------
----------------------------