ठाणे - कोरोनामुळे वधू-वरासाहित येणाऱ्या पाहुणे मंडळींनाही मास्क घालणे अनिवार्य आहे. त्यामुळे आता लग्नसराईसाठी फॅशनेबल मास्क बाजारात आले आहेत. वधूसाठी खास नथीचा मास्क तयार केला आहे.मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन जाहीर झाले आणि मार्च, एप्रिल, मे महिन्यात ठरलेली लग्ने रद्द झाली. अनलॉक १ सुरू झाल्यावर काहींनी घरच्या घरी लग्न उरकून घेतले. डिसेंबरमध्ये लग्नाचे मुहूर्त असल्याने अनेकांनी याच महिन्याचा मुहूर्त साधला आहे. फॅशन डिझायनर शिल्पा चव्हाण यांनी आपल्या कल्पकतेतून ते तयार केले आहेत. वधूला नटविताना नथ हा महत्त्वाचा दागिना तिला घातला जातो. नथीशिवाय चेहरा खुलून दिसत नाही. मास्क घालणे अनिवार्य असल्याने मास्कमध्ये नथ दिसून येणार नाही म्हणून त्यांनी मास्कलाच नथ लावली आहे. त्यात बंगाली, महाराष्ट्रीय, पंजाबी, राजस्थानी समाजातील सोहळ्यानुसार नथीचे मास्क तयार केले आहेत. या मास्कची किंमत २०० रुपयांपासून पुढे आहे. वरासाठी सोनेरी रंगाची लेस लावून सजावटीचे मास्क असून याची किंमत १५० रुपयांपासून पुढे आहे. हे मास्क वधू-वराच्या पेहरावानुसार त्या त्या रंगांचे तयार केले जातात. रिसेप्शन सोहळा असेल तर त्या कपड्यांनुसारही मास्क तयार करून दिले जात आहेत.
वधूचा मास्क हा जरीचा तयार केला आहे. गरम होऊ नये व श्वास घेण्यास अडथळा येऊ नये म्हणून आतून कॉटन वापरले आहे. - शिल्पा चव्हाण
पाहुण्यांसाठीही वेडिंग मास्कवधू-वराच्या बाजूने येणाऱ्या पाहुण्यांना वेगवेगळ्या रंगांचे मास्क आहेत जेणेकरून दोन्ही बाजूचे पाहुणे ओळखता येतील, असे त्यांनी सांगितले.