अंबरनाथ : सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रिका येतात. मात्र, लग्न झाल्यावर पत्रिका रद्दीमध्ये जातात. त्यामुळे आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका ही रद्दी होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी अंबरनाथमधील एका कुटुंबाने चांगला प्रयत्न केला आहे. लग्नपत्रिका ही वहीच्या मुखपृष्ठावर छापण्याचा. त्या वहीचा किमान वापर होईल, या हेतूने त्या कुटुंबाने सर्व पत्रिका वहीवर छापल्या आहेत. त्यामुळे सध्या या लग्नपत्रिकेची चर्चा शहरभर रंगली आहे.अंबरनाथमधील गिरीश आणि मनीषा त्रिवेदी यांचा मुलगा चिंतन याचा विवाह जानेवारी महिन्यात होणार आहे. या विवाहासाठी त्यांनी जी पत्रिका छापली आहे, ती पत्रिका आणि तिच्या संकल्पनेची चर्चा सुरू आहे. पत्रिका वाया जात असल्याने त्रिवेदी कुटुंबीयांनी वहीच्या मुखपृष्ठावर निमंत्रणपत्रिका छापली आहे. पुढे आणि मागे अशा दोन्ही ठिकाणी निमंत्रणाचा मजकूर छापला आहे. ज्या कुणाला निमंत्रण द्यायचे आहे, त्यांना थेट वही दिली जात आहे. त्यामुळे हे निमंत्रण प्रत्येकजण कुतूहलाने पाहत आहे. २०० पानी वही हातात येत असल्याने ती वही चाळल्याशिवाय किंवा मागेपुढे बघितल्याशिवाय कुणीच पत्रिका बाजूला ठेवत नाही.विशेष म्हणजे या निमंत्रणपत्रिकेत त्रिवेदी यांनी पत्नी मनीषा यांच्या आईवडिलांचेही नाव छापले आहे. शक्यतो पत्नीच्या आईवडिलांचे नाव लग्नपत्रिकेत टाकले जात नाही. मात्र, त्रिवेदी यांनी पत्नीच्या आईवडिलांचे नाव टाकून त्यांनाही योग्य मान दिला आहे.दरम्यान, लग्नासाठी नेहमीच महागड्या पत्रिका छापून घेतल्या जातात. त्यातून काहींना आपल्या श्रीमंतीचे दर्शनही घडवायचे असते. मात्र त्रिवेदी कुटुंबाने पाडलेल्या या पायंड्याने अशा मंडळींच्या डोळ््यात झणझणीत अंजन घातले आहे. त्यांचा आदर्श ठेवावा असा सूर शहरातील ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.तब्बल एक हजार पत्रिका छापण्यात आल्या असून त्यातील ज्या पत्रिका उरतील, त्या वह्या गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या मुलाच्या लग्नाची एकही पत्रिका वाया जाणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली आहे. हा प्रयोग इतरांनीही राबविला तर अनेक वह्या गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचणे शक्य होईल.- गिरीश त्रिवेदी, वरपिता
वहीपासून तयार केली लग्नपत्रिका; संपूर्ण परिसरात तिचीच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 10:56 PM