अंबरनाथ : बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागाला जोरदार फटका बसला आहे. कोंडेश्वरजवळील आदिवासीपाड्यांमध्ये वादळी वाऱ्यामुळे काही घरे पडली असून, अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. येथील वीजपुरवठा ठप्प झाला असून तो सुरळीत होण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बदलापूरजवळील कोंडेश्वर परिसरात बेंडशीळ, चिकण्याचीवाडी, चिंचवली आणि चाफ्याचीवाडी या आदिवासी भागांना वादळी वाºयाचा जबरदस्त फटका बसला आहे. बुधवार सायंकाळी ६ नंतर या भागात सोसाट्याच्या वाºयासह पाऊस झाल्याने त्यात अनेक घरांचे नुकसान झाले आहे. काही आदिवासी बांधवांची घरे पूर्ण जमीनदोस्त झाली असून, अनेक घरांचे पत्रेही उडाले आहेत. या भागातील अनेक मोठे वृक्षही उन्मळून पडले आहेत. मोठे विजेचे खांबही पावसाच्या तडाख्यात सापडले. ग्रामीण भागातील नागरिकांनी एकत्र येत रस्त्यावर पडलेले वृक्ष तोडून बाजूला काढले. गुरुवारी दिवसभर ग्रामीण भागातील नागरिकांनी श्रमदानातून हे काम केले. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने या भागाचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी विलंब लागणार असल्याने या भागातील नागरिकांना अंधारातच राहावे लागणार आहे. चिंचवली परिसरामध्ये १५ ते २० घरांना पावसाचा जोरदार फटका बसला आहे. तर, चाफ्याचीवाडी या आदिवासीपाड्यात ३५ ते ४० घरांना पावसाचा फटका बसला आहे. नागरिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार किसन कथोरे आणि तहसीलदार जयराज देशमुख घटनास्थळी गेले होते. त्यांनी ग्रामस्थांबरोबर चर्चा केली.अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात ज्या ग्रामस्थांचे वादळीवाºयामुळे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे लवकरात लवकर करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत. तसेच सरकारकडून त्यांना लागलीच मदत मिळावी, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.- किसन कथोरे, आमदार