भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने विस्तारलेल्या आठवडाबाजाराची सीमा मर्यादित करून नागरिकांना दिलासा दिला होता. परंतु, बंद केलेल्या बाजारांचा पसारा उत्तन रोडवर विस्तारू लागला आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बाजारकरवसुली करणाऱ्या कंत्राटदाराचे हित जोपासले जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे.भार्इंदर पश्चिमेकडील टपाल कार्यालय ते पोलीस ठाणेमार्गे वीणा हॉटेलपर्यंत दररविवारी आठवडाबाजाराचा पसारा वाढत आहे. यात फेरीवाले उदंड होत असल्याने वाहनचालकांना येथे वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे येथून परिवहनच्या बससह अवजड वाहने गर्दीतूनच वाट काढत असतात. वाहतूक पोलीस नसल्याने कोंडीत भर पडते. आठवडाबाजार इतरत्र स्थलांतरित करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला होता. त्याला स्थानिक पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव खो घातल्याने स्थलांतर बासनात गुंडाळले. यात बाजारकर वसूल करणाऱ्या कंत्राटदारांच्या महसुलावर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाल्याची चर्चा सुरू होती. यामुळे आठवडाबाजार पूर्वीच्या रस्त्यावर सुरू झाला. क्रॉस गार्डन ते पोलीस ठाण्यापर्यंतचा बाजार सुरू ठेवल्याने कंत्राटदारावर आर्थिक संकट ओढवण्याची चर्चा रंगली. यामुळे बंद केलेला बाजार केवळ दोन आठवड्यांनंतर पुन्हा विस्तारण्यास सुरुवात झाली. यामुळे नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. (प्रतिनिधी)
आठवडाबाजाराने परत पसरले हातपाय
By admin | Published: February 20, 2017 5:36 AM