कल्याण : कल्याण ग्रामीण परिसरातील तळोजा आणि पलावा सिटी परिसरात वाढत असलेली लोकवस्ती पाहता, त्याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांसाठी केडीएमटीची बससेवा सुरू करण्याची मागणी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी परिवहन उपक्रमाकडे केली होती. यावर बस सुरू करण्यात येईल, असे परिवहन व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, त्यांनी मंजुरी देऊनही वीकेण्ड लॉकडाऊनमुळे ती सेवा सुरू होऊ शकलेली नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात आठ ते पंधरा दिवस लॉकडाऊन लागण्याचे संकेत दिले जात असल्याने या बसेसवर तूर्तास प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सद्यस्थितीला पलावा सिटी आणि तळोजा परिसरात मोठमोठी गृहसंकुले उभी राहत असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वस्ती वाढली आहे. भविष्यात या परिसराला मिनी टाऊनशीपचे स्वरूप येणार आहे. याठिकाणी कामासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना तसेच एकूणच प्रवासी वर्गाला रिक्षा तसेच स्वत:च्या खासगी वाहनाशिवाय दुसरा पर्याय नाही. यावर क्राऊन तळोजा गेट, सेक्टर १० व पलावा गेट सेक्टर-४, पलावा लेकशोअर ते डोंबिवली रेल्वे स्थानकापर्यंत केडीएमटी उपक्रमाची बससेवा सुरू करण्याची मागणी आमदार पाटील यांनी २३ फेब्रुवारीला परिवहन उपक्रमाकडे केली होती. आमदारांच्या मागणीला व्यवस्थापक डॉ. सावंत यांनी हिरवा कंदील दाखवला होता. ७ एप्रिलपासून बससेवा सुरू करण्याचे जाहीरदेखील करण्यात आले होते. परंतु वीकेण्ड लॉकडाऊनमुळे ही बससेवा सुरू करण्यात आलेली नाही. लॉकडाऊन आणि कोरोना संक्रमणाच्या भीतीपोटी नागरिकच घराबाहेर पडत नसल्याने बस चालू करून उपयोग नाही, असा पवित्रा उपक्रमाने घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
---