डोंबिवली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात आठवडी बाजार भरविण्यास मनाई केली असतानाही रविवारी येथील पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात भरविण्यात आलेल्या आठवडी बाजारावर केडीएमसीचे ‘फ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. त्याठिकाणाहून भाजीपाल्यासह अन्य माल जप्त करण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिली.
कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. आजच्या घडीला दरदिवशी ४००हून अधिक रुग्ण मनपा क्षेत्रात आढळून येत आहेत. गेल्याच आठवड्यात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यावश्यक सेवेतील दुकानेवगळता अन्य दुकानांना ती चालू ठेवण्यासाठी निर्धारित वेळ ठरवून दिली आहे. त्याचप्रमाणे आठवडी बाजारावरदेखील बंदी घातली आहे. याउपरही खंबाळपाडा भागात रविवारी आठवडी बाजार भरवल्याचे पहायला मिळाले. याची माहिती मिळताच प्रभाग क्षेत्र अधिकारी सावंत हे पथकातील कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मनपाचे अधिकारी आल्याचे निदर्शनास पडताच बाजार विक्रेत्यांची एकच पळापळ झाली. त्याठिकाणी १५ ते २० जणांनी भाजीपाल्यासह अन्य वस्तूंचे ठेले मांडले होते. तेथील सर्व माल जप्त करण्यात आला असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन नागरिकांनीही करावे, असे आवाहन सावंत यांच्या वतीने करण्यात आले.
------------------------------------------------------
फोटो आहे